(चिपळूण /ओंकार रेळेकर)
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या चिपळूणमधील प्रशांत यादव मित्र मंडळातर्फे विनामूल्य अस्थिरुग्ण उपचार शिबिराचे उद्घाटन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण जोधपूर येथील अस्थीरोग तज्ञ डॉ. नंदकिशोर पाराशर, उद्योजक व वाशिष्टी डेअरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे अध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या हस्ते फीत कापून झाले. तसेच मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिराचे शनिवार दिनांक २ आणि रविवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ अशा दोन सत्रात शहरातील बहादुरशेख नाका येथील ‘सहकार भवन’ येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ८०० हून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.
या शिबिराचे शनिवारी उद्घाटन झाले असून यावेळी स्वर्गीय गोवर्धनलाल पाराशर यांच्या प्रतिमेस चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व उद्योजक प्रशांत यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
डॉ. हेमंत पारशार यांनी या शिबिरासंबंधी माहिती देतांना सांगितले की, या शिबिरा मध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, आणि हाता पायाला मुंग्या येणे यावर उपचार केले जाणार आहेत. शिबिराचा येथील रुग्णांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.
तर या शिबिराचे आयोजक व उद्योजक प्रशांत यादव यांनी या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे भविष्यात अस्थिरोग रुग्णांच्या उपचारासंदर्भात आणखी चांगल्या पद्धतीने कशी सेवा देता येईल, यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.
तर चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, या शिबिराला चिपळूणवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून ७ सप्टेंबर रोजी आयोजित रक्तदान शिबिराला देखील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे यावेळी आवाहन केले. या शिबिरात जोधपूर येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. नंदकिशोर पाराशर यांच्या समवेत डॉ. हेमंत पाराशर, डॉ. जगदीश पाराशर आणि डॉ. सुरज भान सिंग, डॉ. योगेंद्र सिंग हे तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत.
यावेळी चिपळूण नागरीचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, माजी व्हाईस चेअरमन व संचालक सूर्यकांत खेतले, रवींद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिराचे यशस्वी नीटनेटके आयोजन वाशिष्ठी डेअरी अँड मिल्क प्रॉडक्टचे अध्यक्ष प्रशांत यादव व चिपळूण नागरी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तर या शिबिराच्या नियोजनाबद्दल उपस्थितांनी. समाधान व्यक्त केले.