(संगमेश्वर / प्रतिनिधी)
व्यापारी पैसा फंड संस्थेने लॉकडाऊनच्या काळात माजी विद्यार्थी आणि कलाकारांच्या सहकार्याने उभारलेले कलादालन हे कोकणातील ग्रामीण भागात असणाऱ्या नव कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरेल. कला चळवळीमध्ये यापुढेही पैसा फंडने पुढाकार घेऊन कलाकार घडवावेत असे आवाहन माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी केले.
रवींद्र माने हे व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होत. प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने ते प्रशालेत आले असता त्यांनी प्रशालेच्या कलाविभागाने लॉकडाऊनच्या काळात उभारलेल्या कलादालनाला आवर्जून भेट दिली. आपण पैसा फंडच्या कलादालनाबद्दल वृत्तपत्रात वाचत आलो होतो. काही कलाकारांकडूनही आपल्याला याबद्दल माहिती मिळाली होती. आज हे कलादालन पहाण्याचा योग आला आणि माजी विद्यार्थी म्हणून आज आपल्याला खऱ्या अर्थाने प्रशालेचा अभिमान वाटला असे रवींद्र माने यांनी स्पष्ट केले.
यावेळी संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, नावडी सरपंच प्रज्ञा कोळवणकर, माजी विद्यार्थी अभय पाध्ये, विकास शेट्ये, विश्वास कोळवणकर, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे उपस्थित होते. संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते रवींद्र माने यांना एक चित्राकृती भेट देण्यात आली.