२०१८ मध्ये मोरोक्कोतील सहारा वाळवंटात एक उल्का सापडली होती. ती पृथ्वीचाच एक तुकडा असावी, असे आता संशोधकांनी म्हटले आहे. पृथ्वीवर आकाशातून अनेकदा उल्का कोसळत असतात. या उल्का म्हणजे अन्य ग्रह, उपग्रह किंवा लघुग्रहांचा एखादा तुकडा असतो. अगदी मंगळावरून आलेलीही एक उल्का संशोधकांच्या अभ्यासात आहे. मात्र, पृथ्वीवरून अंतराळात गेलेला एखादा तुकडा पुन्हा पृथ्वीवरच परत कोसळण्याची घटना दुर्मीळ असते.
२०१८ मध्ये सहारा वाळवंटात गडद लाल-करड्या रंगाचा दगड सापडला होता. एके काळी तो पृथ्वीवरूनच अंतराळात फेकला गेला होता आणि हजारो वर्षांनंतर तो पुन्हा एकदा पृथ्वीवर आला. याबाबतच्या संशोधनाची माहिती गेल्याच आठवड्यात एका इंटरनॅशनल जियोकेमिस्ट्री कॉन्फरन्समध्ये सादर करण्यात आली. जर्मनीतील गोएथे युनिव्हर्सिटी फ्रँकफर्टमधील भूवैज्ञानिक फ्रँक ब्रेनकर यांनी सांगितले की, हा दगड म्हणजे एक उल्का आहे, याबाबत कोणताही शंका नाही.
मात्र, ती पृथ्वीवरून अंतराळात जाऊन परत आलेली उल्काच आहे का, याबाबत दोन मतप्रवाह आहेत. या दगडाची रासायनिक संरचना पृथ्वीवरील ज्वालामुखीय खडकांसारखीच आहे. या उल्केला ‘एनडब्ल्यूए १३१८८ असे नाव देण्यात आले आहे. तिचे वजन आहे सुमारे ६४६ ग्रॅम आहे. २०१८ मध्ये मोरोक्कोच्या हद्दीत असलेल्या सहारा वाळवंटाच्या भागातील एका अज्ञात ठिकाणी ही उल्का सापडली होती.