(पुणे)
पुणे शहरातील तीन बांधकाम व्यावसायिकाशी संबंधित ४० ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने आज गुरुवारी एकाचवेळी छापे टाकले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात ही छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे.
आयकर खात्याच्या पथकाने बांधकाम व्यावसायिकांचे कार्यालय आणि निवासस्थानी जाऊन कारवाई केलेली आहे. या कारवाईत काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त करण्यात आला आहे. पाषाण रस्त्यावरील सिंध सोसायटी आणि पिंपरी-चिंचवड भागात संबंधित कारवाई करण्यात आली.
या कारवाईत प्राप्तिकर विभागातील मुंबई, पुणे कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून एकूण २५० जण सहभागी झाले. प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून ४० ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले आहेत.इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी छापेमारी का करण्यात आली याबाबतचा अधिकृत खुलासा आयकर विभागाने केलेला नाही. मात्र या कारवाईमुळे गैरमार्गाने आर्थिक व्यवहार करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.