(अलाहाबाद)
पीडितेवर बलात्कार करणार्या आरोपीसमोर न्यायालयाने तिच्याशी विवाह करण्याचा पर्याय ठेवला, पण त्या पीडितेला मंगळ असल्याने आरोपीने तिच्याशी लग्नाला नकार दिला. त्यानंतर त्या पीडितेला खरंच मंगळ आहे का, याची चाचपणी करण्यासाठी न्यायालयाने हे प्रकरण विद्यापीठाच्या अॅस्ट्रॉलॉजी विभागाकडे पाठवले. ही घटना आहे उत्तर प्रदेशातील असून अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणाची दखल आता सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, हे प्रकरण तातडीने सुनावणीस घेत अलाहाबाद न्यायालयाच्या निर्देशाला स्थगिती दिली आहे. उत्तर प्रदेशातील या आरोपीने एका युवतीला लग्न करण्याचे आमिष दाखवले आणि वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर त्याने त्या युवतीशी लग्नास नकार दिला. त्यानंतर युवतीने त्या युवकावर बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केला. बलात्कार प्रकरणी सेशन कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बृजराज सिंह यांच्या खंडपीठाकडे गेले. यावेळी त्या युवकाने मुलीच्या कुंडलीत मंगळ दोष असल्याने तिच्यासोबत लग्नाला नकार दिला, असे न्यायालयाला सांगितले. यावर उच्च न्यायालयाने त्या मुलीला खरोखरच मंगळ आहे का, याची चाचपणी करण्यासाठी हे प्रकरण लखनऊ विद्यापीठाच्या अॅस्ट्रॉलॉजी विभागाकडे पाठवून दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.