( पाचल /वार्ताहर )
राजापूर तालुक्यातील पूर्व भागातील प्रसिद्ध अशा बाजारवाडी मित्र मंडळ, पाचल या मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील श्री. सत्यनारायणाच्या महापूजे निमित्त राजापूर-लांजा तालुका असोसिएशनशी संलग्न संघाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य अश्या स्पर्धेला “कबड्डीचा महासंग्राम” असं नाव मंडळाच्या वतीने देण्यात आलं आहे.
सदर सामने हे सतत दोन दिवस खेळवले जाणार आहेत. आज 28 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता सामन्याची सुरवात मान्यवरांच्या उपस्थितीत व हस्ते होणार असून अंतिम सामना 29 एप्रिल रोजी खेळवण्यात येणारं आहे. या सामन्यासाठी प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस रुपये 11,111 व चषक आहे तर द्वितीय व तृतीय बक्षीसे अनुक्रमे 7,777 व 5555 चषक अशी आहेत. शिवाय शिस्तबद्ध संघ,अष्टपैलू खेळाडू,उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई अशी विविध आणि विशेष बक्षिसे मंडळाच्या वतीने ठेवण्यात आली आहेत.
30 एप्रिल रोजी याच ठिकाणी बाजारवाडी महिला मंडळाच्या वतीने विविध गुंणदर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून 1 मे रोजी संपूर्ण कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून मुलींचा प्रेक्षणीय कबड्डीचा सामना होणार आहे. तरी पाचल परिसरातील सर्व नागरिकांनी मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सत्यनारायणाच्या पूजेला उपस्थित राहण्याचे तसेच कबड्डी स्पर्धेच्या महासंग्रामचा आनंद घेण्याचे आवाहन मंडळाचे कार्यकर्ते महेश रेडीज, निखिल बेर्डे, राजू रेडीज व शशिकांत कामेरकर यांनी केले आहे.