(लांजा /प्रतिनिधी)
पनवेल येथून घरातून पळून आलेल्या दोघा अल्पवयीन मुलांना लांजा पोलिसांनी आडवली रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले. त्यांना पनवेल पोलिसांच्या माध्यमातून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पनवेल कामोठे येथून पळून आलेले हे दोघे दिनांक १० ऑगस्ट रोजी आडवली रेल्वे स्टेशनवर स्टेशन मास्तर गौतम गांधी यांना दिसले. त्यांनी त्यांच्याकडे तिकिटाची विचारणा केली असता त्यांच्याकडे तिकीट नव्हते. गांधी यांना संशय आल्याने त्यांनी लांजा पोलिसांना माहिती दिली. तसेच ११२ नंबर वरही माहिती कळवली.
दोघे पनवेल येथील असल्याचे कळताच पनवेल पोलिसांची संपर्क साधला. यावेळी हे दोघे घरातून गायब झाल्याचा गुन्हा ९ ऑगस्ट रोजी दाखल असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांना पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिले. लांजाचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी बजावण्यात आली.