(जाकादेवी/वार्ताहर)
पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शालेय आवारात व गावातील परिसरात ज्या ज्या ठिकाणी मातीची जागा आहे, अशा ठिकाणी आंबा, फणस तसेच वडाची रोपे लागवड करुन या रोपांचे संवर्धन करण्याचा संकल्प सत्यात उतरवावा, अशा प्रकारचे पर्यावरण पूरक आवाहन मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे उपक्रमशील चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी केले. विद्यार्थ्यांना मे महिन्याच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करताना ते जाकादेवी विद्यालयाच्या सभागृहात मार्गदर्शन करताना बोलत होते.
बंधू मयेकर पुढे बोलताना म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विद्यार्थीदशेपासूनच आजच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करणे आणि त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.आंब्याचा बाटा व फणसाच्या बिया सुकवून पावसाळ्यात रोपे तयार करून ही रोपे शालेय परिसरामध्ये प्रत्येकाने ३० ते ४० रोपे लावावीत. प्रत्यक्ष रोप लावताना फोटो, आणि रोप वाढत असताना तिचे संवर्धन करत असतानाचा फोटो विद्यार्थ्यांनी काढून त्याचा अहवाल शालेय विभागाकडे द्यावा. जेणेकरून पर्यावरणाचा बिघडलेला समतोल आपण थांबू शकतो, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नियोजन करुन पावसाळ्यात हा संकल्प सत्यात उतरावा. हा संकल्प समाजाला आणि देशाला तारणारा आहे. यातूनच खऱ्या अर्थाने आपण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करु शकतो, यासाठी आपण केवळ बोलून चालणार नाही, सांगून चालणार नाही, तर शालेय आवारात व मोकळ्या मातीच्या भागात प्रत्यक्ष वृक्षारोपण करून रोपांचे संवर्धन करणे हाच पर्यावरणावर महत्वाचा कृती उपाय आहे. आंबा, फणस ही रोपे लावाच, शिवाय वडाच्या झाडाचेही आपण रोपण करून त्याचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे विद्यमान चेअरमन बंधू मयेकर यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी शालेय विकास निधी बाबतही मार्गदर्शन केले. याप्रसंगी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे सचिव व शालेय प्रशासनाचे अभ्यासक विनायक राऊत, संस्थेचे संचालक किशोर पाटील, निमंत्रित संचालक श्रीकांत मेहेंदळे, युवा नेते रोहित मयेकर, मुख्याध्यापक बिपीन परकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष पवार,ज्येष्ठ शिक्षक भूपाल शेंडगे यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी केले. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी चेअरमन बंधू मयेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची संकल्पना राबवण्याबाबत केलेल्या आवाहनाला विद्यार्थ्यांसह पालकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.