(चिपळूण)
चिपळूण येथील भेंडीनाका येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून वृद्धाला जबर मारहाण केल्याची घटना ४ जून रोजी घडली. या मारहाणीत आपल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नी गेली असता तिला देखील मारहाण करण्यात आली. या सर्व मारहाणी दरम्यान महिलेचा विनयभंग झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी चिपळुणातील भेंडीनाका येथे दुपारी १२:५० वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी मुनावर उमर मिठागरी, उमर मिठागरी ( पूर्ण नाव माहीत नाही ), अय्यान मुनावर मिठागरी या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी दुपारी महिला व तिचा पती दुचाकीजवळ उभे होते. त्यावेळी मागील भांडणाचा राग मनात धरून मुनावर व अय्यान यांनी बॅटने व स्टील रॉडने जबर मारहाण केली. आपल्या पतीला मारहाण करीत असताना पत्नी भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेली होती. या भांडणात महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.