(राजापूर)
अवकाळी पाऊस, वादळे, सातत्याने प्रतिकूल आणि बदलते वातावरण आदी स्वरूपाच्या सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीने कोकणातील आंबा आणि काजू शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे बागायतदारांना शासनाच्या मदतीची आवश्यकता असून या शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचे निवारण करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याचा सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
फळबाग लागवडीसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेत कोकणातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूची लागवड करत बागा विकसित केल्या आहेत. दरवर्षी हमखास उत्पन्न मिळण्याचे स्वप्न शेतकऱ्यांनी उराशी बाळगले आहे. मात्र, सातत्याने हंगामामध्ये प्रतिकूल राहणारे वातावरण, अवकाळी पाऊस आणि आलेली वादळे यांनी शेतकऱ्यांच्या हमखास उत्पन्न मिळण्याच्या स्वप्नावर पाणी पेरले गेले आहे. त्याचवेळी प्रतिकूल वातावरणामुळे खर्चाच्या तुलनेमध्ये कमी मिळणाऱ्या उत्पन्नामुळे कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आले आहे. त्यांच्या या समस्येकडे आमदार साळवी यांनी मुंडे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
शेतकऱ्यांची ही आर्थिक समस्या निवारण करण्याच्यादृष्टीने शासनाने सकारात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही साळवी यांनी मुंडे यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीची तत्काळ दखल घेत योग्य त्या उपायोजना करण्याचे मुंडे यांनी आश्वासित केले. त्याचवेळी मुंडे यांनी सचिव डॉ. कामरे यांना तत्काळ बैठकीचे आयोजन करण्याचीही सूचना केली.