(सोलापूर)
दसऱ्यानिमित्त सिमोल्लंघनाचा दिवस असताना राज्याच्या राजकारणातून दोन व्यक्तींनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विटद्वारे आपली निवृत्ती जाहीर केली, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी देखील निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
सुशिल कुमार शिंदे हे सोलापुरात धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांना पुढच्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना त्यांनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, “मी हे जाहीरपणे सांगितलेलं आहे की प्रणितीताईच काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार राहतील. मी तर आता राजकारणातून निवृत्त झाल्यासारखाच आहे. पण जी काही मदत लागेन ती मी करत राहीन हे मी तुम्हाला सांगतो. मात्र मी आता सक्रिय राजकारणातून निवृत्त झालोय. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे उमेदवार असतील” अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी दिली.
सुशिलकुमार शिंदे यांनी केलेल्या विधानामुळे आता नवीन चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसचा सोलापूरमधील लोकसभेचा उमेदवार प्रणिती शिंदे याच असणार आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षणे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून प्रणिती शिंदेंच्या रुपानं पहिली उमेदवारी जाहिर झाल्यासारखचं आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी १६ जानेवारी २००३ ते १ नोव्हेंबर २००४ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर २००४ ते २००६ या कालखंडात ते आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदीही आरूढ होते. डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात त्यांना गृहमंत्री पद तर अर्थमंत्री असताना सलग नऊ वेळा त्यांनी अर्थसंकल्प मांडला आहे. यातच सलग साडेसहा वर्षे केंद्रीय उर्जामंत्री पदावर राहणारे आणि लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेते होते.
दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४१ साली सोलापूरात झाला. वडिलांच्या आकस्मिक निधानामुळे लहाणपणीच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. इयत्ता आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची नोकरी केली. १९६५ साली बीए पास झाल्यावर नोकरी सोडून त्यांनी पुणे गाठले. येथे कायद्याचे शिक्षण घेत असतानाच पोलिस उपनिरिक्षकपदासाठी त्यांनी मुलाखत देऊन रूजू झाले.