आम्ही पोलीस प्रशासक बदल्या आणि पोस्टींगसाठी राजकीय नेत्यांवर अवलंबून राहिलो आहोत. हे समाजासाठी चांगले नाही, असे म्हणत माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुणे हिंसाचारावेळी घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख करून नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचा उल्लेख करत अजून एक गौप्यस्फोट केला आहे.
सध्याच्या परिस्थितीत राजकीय नेते पॉवरफुल झाले आहेत असे म्हणत त्या म्हणाल्या की, ज्यावेळी नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा होता. त्यावेळी आमच्याकडे तांत्रिक पुरावा होता. पुणे बंदमध्ये हिंसाचार कसा करावा याबाबत चांगला पुरवा होता. माझे अधिकारीच मला तेव्हा म्हणाले, मॅडम गुन्हा दाखल करू नका. आम्हाला तुम्हाला मुंबई पोलीस आयुक्त झालेले पाहायचे आहे. त्यामुळे त्यावेळी मी खूप दबावाखाली होते. आपण जर असं केलं तर आपल्याला पोलीस आयुक्त पद देण्यात येणार नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.
मी जे घडलंय ते पुस्तकात लिहिलंय. व्हिलन तेव्हा होतो जेव्हा शासकीय जमीन आपण देऊन टाकली असती. पुणे पोलिसांना हा प्रस्ताव मान्य नाही असं आपण जेव्हा शासनाच्या निदर्शनाला आणले. आम्ही जागा देणार नाही असे सांगितल्यानंतर शासनाने आदेश मागे घेतला. माझ्या विरोधाची मला किंमत चुकवावी लागली, पण वाईट वाटलं नाही कारण मी घेतलेला निर्णय योग्य होता. मला निवृत्त होऊन सहा वर्षे झाली, कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, असं मीरा बोरवणकर यांनी सांगितले.
पुस्तकाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, वर्षभरापूर्वीच मी पुस्तक लिहिलंय. प्रकाशन उशिरा झालं. कुठल्याही राजकीय पक्षाला एकदम रोखठोक अधिकारी आवडत नाही. आपण कुठल्याही राजकीय पक्षाला जबाबदार धरू शकत नाही. जे अधिकारी त्यांचे सांगणे ऐकतात तेच नेत्यांना आवडतात, असंही त्यांचं म्हणणं आहे.
जागा तिथंच आहे, चौकशी कोणाची करता? अजित पवार यांचा मिष्कील खुलासा
अरे बाबांनो कसली चौकशी करता आणि कोणाची करता. जागा आहे तिथंच आहे. सगळे पोलीस अधिकारीही जाऊन पाहून आले आहेत. मग कसली चौकशी करता? असा प्रतिप्रश्न करत अजित पवार यांनी मिष्कीलपणे आपल्यावरील आरोपांचे खंडण करत प्रत्युत्तर दिले आहे. माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात केलेल्या आरोपांवर प्रसारमाध्यमांतन बातम्या आल्या होत्या. त्याचे खंडण करताना अजित पवार यांनी आपल्यावरीस सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
अजित पवार म्हणाले की, पाठीमागील दोन तीन दिवसापासून एका माजी पोलीस आयुक्तांनी लिहिलेल्या पुस्तकाचा दाखला देत प्रसारमाध्यमांतून बातम्या येत आहेत. परंतू, त्या बातम्यांचा आणि माझा दुरान्वयेही संबंध नाही. खरे तर मी भला आणि माझे काम भले. कोणी काही टीका टिपण्णी केली तर त्याकडे लक्ष द्यायचे नाही, असा माझा पवित्रा असतो. परंतू, प्रसारमाध्यमांनी काही गोष्टी अधिकच लिहील्या आहेत, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. येरवडा पोलीस स्टेशन परिसर विकास प्राधिकरण प्रकरमी माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी यांच्या आरोपाच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताचे खंडण केले. माझ्यावरील आरोपांना मी फारसे महत्त्व देत नाही, असेही ते म्हणाले.