(नवी दिल्ली)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत नीती आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. त्यासाठी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या बैठकीत अनेक राज्यांतील पायाभूत सुविधा, गुंतवणूक, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणा या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. मात्र देशातील सहा मुख्यमंत्र्यांनी निती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार घातल्याची मोठी बातमी समोर आली आहे. देशाच्या नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार घातल्यानंतर आता नीती आयोगाच्या बैठकीवरही विरोधकांनी बहिष्कार घातला आहे.
जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळं आता यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यामुळं तेही नीती आयोगाच्या बैठकीला हजर राहणार नसल्याची माहिती मिळत आहे.