(नाशिक / प्रतिनिधी)
वैयक्तिक किंवा कौटुंबिक जबाबदारी पार पाडली म्हणजे कर्मयोग साधला असे होत नाही. तर निष्काम समाजसेवा हाच सर्वश्रेष्ठ कर्मयोग आहे असे स्पष्ट प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख श्री. नितीनभाऊ मोरे यांनी केले.
पुरुषोत्तम मासानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील श्री गुरुपीठात सुलभ भागवत सप्ताह सुरु आहे. त्यावेळी श्री. मोरे यांनी भागवत ग्रंथाचे माहात्म्य उलगडून सांगितले. आपल्या अमृततुल्य हितगुजात त्यांनी चार युगांचे वर्णन, दशावतार, भागवत ग्रंथातील विविध कथा आणि त्र्यंबकेश्वरच्या भूमीचे पौराणिक व आध्यात्मिक महत्त्व अत्यंत अभ्यासपूर्ण मांडले.
भागवत ग्रंथावर बोलतांना ते म्हणाले की, भागवत ग्रंथाचे पारायण ही अतिउच्च सेवा मानली जाते. ही सेवा करता यावी यासाठी सेवामार्गाने सुलभ भागवत या ग्रंथाचे प्रकाशन केले. मात्र कालानुरुप बदल स्वीकारायला हवा या भूमिकेतून परमपूज्य गुरुमाऊलींनी सेवेकर्यांसाठी संक्षिप्त 700 श्लोकी भागवत ग्रंथाची निर्मिती केली. मूळ भागवत ग्रंथामध्ये 345 अध्याय आहेत. त्या प्रत्येक अध्यायाचे सार दोन ओव्यांमध्ये मांडण्यात आले. अशापद्धतीने 690 ओव्या तयार झाल्या आणि 10 अतिरिक्त ओव्यांचा समावेश करुन 700 श्लोकी संक्षिप्त भागवत ग्रंथ गुरुमाऊलींनी सेवेकर्यांच्या हाती सुपूर्द केला. सुलभ भागवताचे संपूर्ण सारसर्वस्व म्हणजे संक्षिप्त भागवत आहे. संक्षिप्त भागवताच्या पारायणामुळे मिळणारी फलश्रुती ही मूळ भागवताच्या पारायणा इतकीच आहे. गुरुमाऊलींनी काळाची गरज ओळखून संक्षिप्त भागवत, 900 श्लोकी नवनाथ भक्तीसार, दुर्गा सप्तशती आणि स्वामीचरित्र सारामृत हे तासाभरात पठण होणारे ग्रंथ तयार केले अशी माहिती श्री. मोरे यांनी दिली.
ब्रह्मदेवाने सृष्टी रचण्यासाठी ब्रह्मगिरीवर तप केले, निवृत्तीनाथांना, गहिनीनाथांनी याच ब्रह्मगिरीवर दीक्षा दिली, गंगेचे उगमस्थान याच पर्वतावर आहे. अत्री-गौतम ऋषींच्या तपामुळे ही भूमी पावन झालेली आहे, नवनाथांच्या पदस्पर्शाने ही भूमी तेजस्वी बनली आहे, दत्तावताराच्या वास्तव्याने ही भूमी स्वर्गतुल्य ठरली आहे आणि श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग व श्री स्वामी महाराजांच्या पवित्र स्थानामुळे या भूमीच्या लौकिकात अधिकच भर पडली आहे, अशा शब्दात त्यांनी त्र्यंबकेश्वर-ब्रह्मगिरीचे महत्त्व अधोरेखित केले.
भक्ती, ज्ञान व कर्मयोग साधा!
सेवेकर्यांनी भक्तीयोग आणि ज्ञानयोग साधतांना कर्मयोगाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. समाजकारण हाच कर्मयोग असून सेवेकर्यांनी ग्राम व नागरी विकास अभियानाच्या माध्यमातून कर्मयोग साधावा असे श्री. नितीनभाऊ मोरे यांनी नमूद केले. परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरु मोरेदादा व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या तेजस्वी कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.