(मुंबई)
राज्यात शैक्षणिक क्षेत्रांना उन्हाळी सुट्टी लागली असल्यामुळे अनेक शिक्षक या सुट्टीत गावी गेले आहेत. मात्र शिक्षकांना सुट्टी मिळाली तर निवडणुकीचे काम कोण करणार, असा सवाल उपस्थित करत प्रशासनाने शिक्षकांना मतदार नोंदणीच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनेक शिक्षक गावी असल्यामुळे निवडणूक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मुंबईतील एका पोलीस ठाण्याला अर्ज देऊन फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
पुढील काही दिवसांत लोकसभा, विधानसभा आणि पालिकेच्या निवडणुका येणार असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील लगबग वाढली आहेत. मतदार नोंदणीसंबंधीत कामे करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज भासत आहे. म्हणूनच शिक्षकांना ही मतदार नोंदणीची कामे सोपवण्यात येणार आहेत. यासाठी शिक्षकांना त्वरित हजर होण्यास सांगितले आहे.
हा निर्णय झाला तेव्हाच जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांना भेटून शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत हे काम न देण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी असा निर्णय घेणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र तरीही ही कारवाई होत असेल तर आम्ही पूर्णपणे शिक्षकांच्या पाठीशी आहोत. शिक्षकांनी आपली सुट्टी अर्धवट सोडून परतू नये. आम्ही येत्या दोन दिवसांत आंदोलनाची दिशा जाहीर करू, असे शिक्षक संघटनेकडून सांगण्यात आले आहे.