पुणे महापालिकेनं प्रस्ताव दिला तर लवकरच पुण्यात उडणाऱ्या बसेस धावतील, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला होता. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्या या दाव्यावर टीका केली होती. त्यानंतर आता ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी देखील गडकरींच्या त्या वक्तव्यावर टीका करत त्यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. पुणे शहरात भाजप सत्तेवर असताना त्यांनी शहराच्या विकासकामांबद्दल अभ्यास का नाही केला? असा सवाल करत गडकरी जे बोलत आहेत, त्यातलं काहीही होणार नसल्याची टीका आनंद दवे यांनी केली आहे.
काल नितीन गडकरी हे पुण्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी शहरातील वाहतूक कोंडी, चांदणी चौकातील वाहतुक कोंडीची समस्या, शहरातील दोन महानगरपालिका, रोप वे, स्काय बस अशा मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. त्याला उत्तर देताना दवे म्हणाले की, मागच्या पाच वर्षात रोपवे का नाही झाला?, त्याच्या बजेटचं काय झालं?, भाजपच्या लोकांना पाच वर्षात आंबिल ओढ्याची भिंत बांधता आली नाही, ते काय रोपवे बांधणार आणि काय हवेत बसेस उडवणार? असा सवाल करत आनंद दवेंनी नितीन गडकरींनी केलेल्या दाव्याची खिल्ली उडवली आहे.
नितीन गडकरींवर टीका करताना दवे म्हणाले की, उडती बस, रोपवेचं काम नंतर करा. परंतु सर्वात आधी शहरातील नागरिकांना चांगलं पाणी, चांगले रस्ते आणि पीएमपीची सुविधा देण्याची मागणी दवे यांनी केली आहे.