(रत्नागिरी)
नारायणरावजी राणे यांना शह देण्यासाठी, तसेच त्यांच्याबरोबर भांडणे करण्यासाठीच मला सिंधुदुर्गचा पालकमंत्री बनवण्यात आले, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केला. या राजकीय गौप्यस्फोटाबरोबरच त्यांनी गोव्यातून आपल्याला कसा फोन आला हे देखील सांगितले.
रत्नागिरीतील कार्यक्रमात ना. सामंत म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असताना मला सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद दिले गेले. परंतु, हे देताना विचार करूनच दिले गेले. तेथील मेडिकल कॉलेज हे एक ईयेंपोटी निर्माण झाले. परंतु, आजही त्या कॉलेजमध्ये अनेक गैरसोयी आहेत. त्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, असे ना. सामंत म्हणाले.
शिंदे सरकारची स्थापना होताना आपल्याला गोव्यातून कसा फोन आला हे देखील यावेळी ना. सामंत यांनी सांगितले. ना. सामंत म्हणाले, पहाटे ३ वाजता फोन आला. त्यानंतर सकाळी ७ वाजता आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तेथे भेटलो. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तुमच्या जिल्ह्यासाठी प्राधान्यक्रमाने काय काय पाहिजे, याची विचारणा केली. त्यानुसार मेडिकल कॉलेजसह अन्य विकासकामे सांगितली गेली. ती पूर्णत्वास गेली आहेत. दोन आठवड्यात या मेडिकल कॉलेजला मंजुरी देण्याचे काम करण्यात आले, असे ना. सामंत यांनी सांगितले.