(नाणीज)
श्री क्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्रचायजी महाराज संस्थांतर्फे आज (३० मार्च) श्रीराम नवमी उत्सव मोठ्या दिमाखात, उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे. त्यासाठी येथील श्रीराम मंदिर आकर्षकपणे फुलांनी व विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे. भाविकांनी सोहळ्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे.
आज सकाळी या वारी उत्सवाला सुरुवात झाली. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी सकाळी प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात जाऊन श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांचे दर्शन घेतले. सकाळी सप्त चिरंजीव महामृत्यूनंजय याग सुरू झाला. त्याचे पौरोहित्य वे.शा.सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरुजी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह केले. त्यानंतर दुपारी नाथांचे माहेर व सुंदरगडावरील सर्व देवदेवतांना उद्याच्या सोहळ्याचे निमंत्रण वाजतगाजत, मिरवणुकांनी जाऊन देण्यात आले. त्यामुळे येथे उत्साहाचे वातावरण तयार झाले. दिवसभर सुंदरगड गर्दीने फुलून गेला होता. आज सोहळ्याचा मुख्य दिवस आहे.
दरम्यान आज दुपारी १२.१५ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उदय सामंत यांचे सुंदरगडावरील कॉलेज पटांगणावर आगमन होईल. त्यानंतर १२.२० वाजता त्यांच्या हस्ते जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या येथे उभारण्यात येणाऱ्या महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज, प.पू. कानिफनाथ महाराज उपस्थित राहणार आहेत.
या भूमिपूजन सोहळ्यानंतर १२.४० ला पाहुणे श्रीचे दर्शन घेतील. १२.५० वाजता संस्थानतर्फे श्री गडकरी व श्री सामंत यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी दोघेही उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत.
बुधवारी सकाळी नऊ वाजता येथील सद्गुरू काडसिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये मोफत सर्वरोगनिदान शिबिर सुरू होते. तिथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यास गर्दी होती. तर दिवसभर २४ तास महाप्रसाद सुरू होता. त्याचा लाभ भाविक घेत होते.