(लांजा)
लांजा नगरपंचायतीचा कचरा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला असून कचरा टाकण्यास किंवा डम्पिंग ग्राउंड प्रकल्प करण्यास धुंदरे वांजुदेवी परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. याबाबत आज सोमवारी १८ एप्रिल रोजी लांजा नगरपंचायतीला निवेदन सादर करण्यात आले. धुंदरे वांजुदेवी परिसरात डम्पिंग ग्राउंड प्रकल्प करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल. प्रसंगी जनआंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
लांजा नगरपंचायतीचा कचरा प्रश्न सध्या चांगलाच पेटला आहे. कचरा टाकण्यास नगरपंचायती कडे स्वतःची जागा नसल्याने आणि भाडेतत्त्वावर घेतलेल्या धुंदरे येथील जागेला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. यामुळे नगरपंचायत समोर कचऱ्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला असून गेल्या तीन दिवसांपासून नगरपंचायतीच्या घंटागाडी देखील प्रभागांमध्ये फिरलेल्या नाहीत.
या साऱ्या पार्श्वभूमीवर धुंदरे वाजुदेवी परिसरातील नागरिकांनी सोमवारी लांजा नगर पंचायतीला निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की धुंदरे वांजूदेवी परिसरात ज्या चिरेखाणी आहेत त्यांचा वापर लांजा नगरपंचायत घन कचरा टाकण्यासाठी करणार आहे अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. सदर जागेपासून १०० फुटांवर देवीचे मंदिर आहे. तसेच पन्नास फुटांवर आम्ही श्री वांजूदेवीच्या ठिकाणांमध्ये वाघबारस करतो. तसेच सदर जागेपासून शंभर फुटांवर बारमाही वाहणारी नदी आहे तिचे पाणी लांजा नगरपंचायतीच्या नळ पाणी योजनेसाठी वापरले जाते.
नगरपंचायत प्रभाग क्रमांक एक हाच घनकचरा प्रकल्पाला का दिसतो? लांजा नगरपंचायत मार्फत यापूर्वीही धुंदरे येथील जागेसाठी प्रयत्नशील होती. त्यावेळी पण आम्ही त्याला विरोध केला होता. तसेच आत्ता पण वांजुदेवी मंदिराच्या आजुबाजुच्या परिसरामध्ये घनकचरा प्रकल्प करणार असाल तर धुंद्ररे ग्रामस्थांचा तीव्र विरोध राहील. तसेच आम्ही जन आंदोलन करू असा इशारा नगर पंचायतीला देण्यात आला आहे.