(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर शहरालगतच्या साडवली येथील सैनिक वसाहतीतील फ्लॅट फोडून सोन्या, चांदीचे दागिने लांबवल्याची घटना 3 फेब्रुवारी रात्री 12 ते 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद उल्हास जयराम चांदे (44, साडवली, सैनिक वसाहत, देवरुख) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साडवलीतील दयागिरी बिल्डींगमध्ये उल्हास चांदे यांचा 5 नं. ला फ्लॅट आहे. उल्हास हे बाहेरगावी गेलेले असताना अज्ञाताने फ्लॅटच्या दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. घरातील चांदीचे व सोन्याचे दागिने लंपास केले. उल्हास यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी देवरुख पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.