दिल्लीतील मुंडका मेट्रो रेल्वे स्टेशनच्या जवळ ३ मजली इमारतीला शुक्रवार, १३ मे रोजी रात्री १० वाजता भीषण आग लागली. या आगीत तब्बल २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पश्चिम दिल्लीतील ग्रीन लाईनवरील मुंडका मेट्रो स्टेशनच्या खांब क्रमांक 544 जवळील एका व्यावसायिक इमारतीला ही आग लागली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आगीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी इमारतीच्या खिडक्या तोडल्या, लोकांना वाचवले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.
पोलिस उपायुक्त (बाह्य), समीर शर्मा यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की या तीन मजली व्यावसायिक इमारतीचा वापर सामान्यत: कंपन्यांना कार्यालयासाठी जागा देण्यासाठी केला जात होता.
ही आग विझवण्यासाठी १५ अग्निशमनच्या गाड्यांनी प्रयत्न केला. या आगीत जखमी झालेल्या काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर काहींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही आग कशामुळे लागली आहे, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र मागील काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे दिल्लीत आगीच्या घटना वाढत आहेत असे अनेकांचे म्हणणे आहे.
दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळ रात्री आग लागलेल्या 3 मजली व्यावसायिक इमारतीमधून 2७ मृतदेह बाहेर काढण्यात आले. अशी बातमी एएनआयने दिल्ली अग्निशमन सेवेचे उप मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील चौधरी यांच्या हवाल्याने दिली.
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही याबाबत शोकसंतप्त कुटुंबियांना शोक व्यक्त केला आहे. दिल्लीतील मुंडका मेट्रो स्थानकाजवळील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने दुःखी झालो. शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. जखमीं लोक लवकरात लवकर बरे होवोत, असे कोविंद यांनी ट्विट केले.