(दापोली)
जंगल, डोंगर, नद्या, वायू, जमीन आणि समुद्र यांमुळे या सृष्टीतील पर्यावरण चांगले राहते. या घटकांची पर्यावरण संवर्धनात प्रमुख भूमिका असते. हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा भरमसाठ अविचारी वापर आणि वाढते प्रदुषण यामुळे मानवाचे भविष्य अंधारमय आहे. याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. यानिमित्ताने जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी २४ एप्रिल
२०२२ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:३० वाजता सुरु होईल. ती डॉ आंबेडकर चौक – एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण चौक – गिम्हवणे – कृषि विद्या विभाग, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ – आझाद मैदान अशी ७ किमीची असेल. कृषि विद्या विभाग येथे विभाग प्रमुख डॉ प्रशांत बोडके आणि सहकारी वसुंधरा, जमीन, सेंद्रिय शेती, पिके, हवामान अंदाज वेधशाळा, पर्यावरण याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ९१५८५२८५७३, ८६५५८७४४८६ हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सर्वांसाठी दर महिन्याला एक सायकल फेरी आयोजित केली जाते. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.