(मुंबई)
दापोली-मुंबई मार्गावर नऊ वर्षांपूर्वी झालेल्या एका एसटी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर कामावरून बडतर्फ करण्यात आलेल्या संबंधित चालक सिद्धार्थ सावंत यांना पुन्हा कामावर घेण्यात यावे, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई कामगार न्यायालयाने दिला आहे.
एसटी चालक सिद्धार्थ जाधव हे २० फेब्रुवारी २०१४ रोजी दापोली-मुंबई ही बस चालवत होते. त्यावेळी ही बस पांढरापूर जवळ आली असताना एका वाहनाने एसटीला पाठीमागून धडक दिली. यात त्या वाहनावरील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर एसटी महामंडळाने केलेल्या चौकशीत गुन्हा सिद्ध झाला नसतानाही चालक सिद्धार्थ जाधव यांना कामावरून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर सिद्धार्थ जाधव यांनी कामगार न्यायालयात धाव घेतली.
अॅड. सुनील पाटील यांनी जाधव यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली. त्यावेळी न्यायाधीश व्ही. ओ. पाटील यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर बसचालक सिद्धार्थ जाधव यांना पुन्हा कामावर घेऊन, त्यांना १२ डिसेंबर २०१४ पासून आतापर्यंतचा पगार द्यावा, असा आदेश दिला.