( दापोली / प्रतिनिधी )
दापोली शहरातील शिवसेना शाखेची जागा कुणाच्या हक्काची, यावरून शहरांत उद्धव ठाकरे गट व शिंदे गट या दोन्ही गटात तुफान राडा झाला. यात पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी शिंदे गटातील १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दापोली पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे गटाकडून शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास शहरात रॅली काढून शहरातील शिवसेना शाखेवर दावा सांगण्यात आला. यावेळी शिंदे गट व ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर भिडल्यामुळे शहरातील शिवसेना शाखा कार्यालयासमोर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यातून प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दापोली पोलिसांनी तत्काळ जादा कुमक शिवसेना शाखेजवळ मागवून परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. यामुळे मोठा अनर्थ टळला. दोन्ही गटातील येथील कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
ठाकरे गटाच्या तक्रारीनुसार, शिंदे गटातील सुरेश खानविलकर, प्रसाद रेडेकर, बाबू पारकर, सुयोग धाग, नदीम मुकादम, प्रकाश साळवी, मंगेश राजपूरकर, जयराज खोपकर, – ओमकार दुर्गावळे, निखिल परब, ओंकार दळवी, प्रितेश शिर्के, प्रितेश किर्लेकर, राजगुजर सीमाज काझी अशा सुमारे १५ जणांविरोधात भादंवि कलम ३५४, ३२३, ५०४, ५०६, ४२७, १४३, १४७, १४९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ एक, तीन मनाई आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार दाखल करीत असताना सोन्याचे दागिने चोरीला गेले. मारहाण करून दुखापत केले त्याचप्रमाणे विनयभंग केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या मानसिक विचारे यांनी शिंदे गटातील वरील सर्वांवर तर शिंदे गटाच्या संजना खानविलकर यांनी ठाकरे गटाच्या यश विचारे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भादवि कलम 354, 323, 427, 34 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वीही दापोलीत शिवसेना शाखा कुणाच्या मालकीची यावरून दोन्ही गटात राडा झाला होता, तेव्हाही पोलिसांनी मध्यस्थी करून तणाव नियंत्रणात आणला होता.