(मुंबई)
आयआयटी मुंबईतील दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाला दर्शन सोलंकीची सुसाइड नोट सापडली आहे. यामध्ये दर्शनने एका विद्यार्थ्याच्या त्रासाने व दिलेल्या धमकीने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी दर्शन सोलंकीने वसतीगृहातील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. ही आत्महत्या जातीयवादातून झाल्याचा आरोप आयआयटीतील विद्यार्थी संघटना तसेच अन्य सामाजिक संघटनांनी केला होता. याप्रकरणी आयआयटीने एक समिती स्थापन करून चौकशी सुरू केली होती. दुसरीकडे सामाजिक संघटनांच्या दबावामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत एका सह पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली होती. त्यानंतर या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाला दर्शन सोलंकीची सुसाइड नोट मिळाली आहे. दर्शनने आत्महत्या करण्यामागे जातीवाचक टिप्पणीदेखील कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. या सुसाइड नोटमध्ये दर्शनने एका विद्यार्थ्याचे नाव लिहिले असून त्याच्याकडून मानसिक छळ आणि धमकी दिली जात असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. या सुसाइड नोटमुळे दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.