(कोल्हापूर)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. नागपूर आणि पुण्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शहा यांनी कोल्हापुरात संकल्प मेळाव्याला हजेरी लावली. यात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. २०१९ साली विधानसभेची निवडणूक आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली, परंतु निवडणुकीचे निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची “शिवसेना” राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चरणात नेवून ठेवली, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
यावेळी बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या तोंडाला सत्तेचं पाणी सुटलं. त्यामुळं त्यांनी सर्व सिद्धांताला मूठमाती देत शरद पवारांच्या चरणावर जाऊन बसणं पसंत केलं. परंतु आम्ही सत्तेसाठी सिद्धांताचा बळी दिला नाही, ठाकरेंनी तो दिला, असं म्हणत अमित शहांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं आमचाच मुख्यमंत्री बनायला हवा होता. परंतु आता काळ बदलला आहे. खरी शिवसेना धनुष्यबाणासह भाजपसोबत आली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचं कामही भाजपनंच केलं आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्याचं कामही आपोआप पूर्ण झाल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही केंद्रात सरकार चालवत आहोत, १२ लाख कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या काँग्रेस पार्टीसह शरद पवार आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी आमच्यावर आतापर्यंत एक पैशाच्या घोटाळ्याचा आरोप केलेला नाही. कारण आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, त्यामुळंच आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याची कुणाचीही हिंमत झालेली नाही, असंही अमित शहा म्हणाले.
मागच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४८ पैकी ४२ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी आपल्याला बहुमत मिळालं होतं, परंतु केवळ त्यावरच संतुष्ट होऊन चालणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला फक्त बहुमत नाही तर संपूर्ण विजय हवा आहे. महाराष्ट्रातील ४८ पैकी ४८ जागांवर भाजपला विजय मिळायला हवा, असा निर्धारही अमित शहांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला आहे.