(धाराशिव)
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गाभाऱ्यात जाण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ड्रेसकोडचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. गुरुवारी सकाळीच तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांच्या वतीने एक नियमावली जारी करण्यात आली होती. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिले आहेत.
दरम्यान तुळजाभवानी मंदिरात आता अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणा-यांना नो एन्ट्री अर्थात प्रवेश बंदी असणार असल्याची नियमावली जारी केली होती. तुळजाभवानी मंदीर संस्थानने मंदीर परिसरात याबाबतचे फलक लावले होते. यात अंगप्रदर्शन, उत्तेजक असभ्य अशोभनिय वस्त्रधारी, हाफ पॅन्ट, बमुर्डाधारकांना आता मंदिरात प्रवेश नसल्याचे नमूद होते. भारतीय संस्कृती व सभ्यत्याचे भाव ठेवण्याचे मंदीर संस्थांनने आवाहनही केले होते.
मंदिर व मंदिर परिसरात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृती संदर्भात बोर्ड लावण्यात आले होते. यानिमित्ताने मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सौदागर तांदळे व सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांचा सर्व पुजारी वर्गाने सत्कारही केला. मात्र भाविकांच्या विरोधापायी सदर निर्णय मागे घेण्यात आला आहे.