(इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण पार पडले. पालखीला अगोदर पोलीस, नंतर झेंडेकरी, त्यानंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी, त्यानंतर विणेकरी यानंतर मानाच्या पालखी बरोबर असणाऱ्या अश्वाने रिंगणाच्या तीन फेऱ्या मारल्या. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी इंदापूर आणि जवळच्या परिसरातील हजारो भाविकानी गर्दी केली होती.तुकाराम महाराजांचा जयघोष करत वारकऱ्यांनी पहिले गोल रिंगण पूर्ण केले.
बेलवाडी मध्ये पालखी सोहळा दाखल होताच मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले होते. पालखी रिंगणामध्ये येत असताना मानवी मनोरा करून पालखीला सलामी देण्यात आली. त्यानंतर भगव्या पताका घेतलेल्या वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात धावत फेऱ्या पूर्ण केल्या. यांनतर डोक्यावर हंडा तुळस घेतलेल्या महिला वारकऱ्यांनी विनेकऱ्यांनी पालखी भोवती प्रदक्षिणा घातल्या, त्यानंतर पालखीचे मानाचे अश्व व मोहिते पाटलांचे अश्व रिंगणामध्ये दाखल झाले. अश्वांचे पूजन करून पालखीच्या अश्वांच्या रिंगणाला सुरुवात झाली. पालखी सोहळ्याने अंथुर्णे मुक्कामाकडे प्रस्थान केले. अंथूर्णे येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.