(नवी दिल्ली)
अरविंद सावंतांनी मांडलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी परखड उत्तर दिले. मोदी – शाहांवर बोलाल तर तुमची औकात दाखवेन, असा सज्जड दम नारायण राणेंनी ठाकरे गटाच्या खासदारांना भरला. अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावर दिवसभरातल्या चर्चेत बाकीच्या सर्व खासदारांपेक्षा नारायण राणे यांचे तीन-साडेतीन मिनिटाचे भाषण लोकसभा गाजवून गेले.
लोकसभेत मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरुन जोरदार घमासान सुरू आहे. यातच महाराष्ट्रातील खासदारांमध्ये देखील जुंपल्याचं पाहायला मिळालं. त्यातही विशेषत: भाजपचे मंत्री नारायण राणे हे शिवसेना (UBT) खासदारांविरोधात प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. ‘यांनी यापुढे भाजप आणि पंतप्रधानजी आणि अमितजी शाह यांच्यावर बोट जरी उगारलं तर तुमची औकात मी काढेल.. काय खरं आहे ते मी बाहेर काढेल’ असा धमकीवजा इशाराच राणेंनी यावेळी दिला.
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रत्युत्तर देताना जोरदार हल्ला चढवला. ‘हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. आम्ही जन्मजात आहोत… हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात… हिंदुत्वात पळ काढणारे नसतात… जे पळ काढणारे आहेत ते काय बोलतील… यांच्यात एवढा दम असेल तर… बाळासाहेबानी हिंदुत्व हे म्हणजे काय सांगितलं होतं ते माहितीए का? ते म्हणाले होते की, मंदिरात घंटा बडवणारा हिंदू नकोय मला.. दहशतवाद्यांना मारणारा हिंदू हवाय मला.. ‘खोटे लोक हे सत्य सांगायचा प्रयत्न करतायेत.. जे म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी तुम्हाला सोडलं.. अरे ज्यांच्यासाठी तुम्ही सोडलं ना.. ते आले तुमच्याकडे परत.. त्यांचं नाव घेऊन पंतप्रधान म्हणाले की, एनसीपी काय आहे.. तर नॅशनल करप्ट पार्टी.. 70 हजार घोटाळे झाले… ज्यांच्या नावावर घोटाळे ते सरकारमध्ये सहभागी झाले. फक्त सहभागी नाही झाले तर मंत्री पण बनले.. त्यामुळे पळ काढणारे आता बोलणार?’ असं म्हणत सावंतांनी निशाणा साधला होता.
यानंतर बोलण्यास उभे राहिलेल्या नारायण राणेंनी अत्यंत आक्रमकपणे अरविंदा सावंत आणि ठाकरे गटावर टीका केली. ते म्हणाले, ‘अविश्वास प्रस्तावावर या सभागृहात मी अनेकांची भाषणं ऐकली. आता नुकतंच शिवसेना (उद्धव गटाचे) अरविंद सावंत यांचं भाषण ऐकताना मला असं वाटलं की, मी दिल्लीत नाही तर महाराष्ट्रात विधानसभेत बसलोय..’
‘कारण.. (अरे मी तुमचं ऐकलं ना.. आता तुम्ही माझं ऐका..) अध्यक्ष महोदय, अविश्वास प्रस्तावावर.. शिंदे साहेबांनी जे विचार मांडले.. त्यांना उत्तर देण्याचं काम केलं आहे.. त्यांनी हिंदुत्वाची भाषा केली.. शिवसेना (उद्धव गट) हिंदुत्व कसं आहे याबाबत देखील श्रीकांत शिंदे बोलले.’ ‘आता हिंदुत्व त्यांना हवं आहे.. त्यांना गर्व आहे.. तर 2019 ला सत्ता मिळविण्यासाठी भाजपला सोडून त्यावेळी गद्दारी करून पवार साहेबांसोबत गेले तेव्हा त्यांना हिंदुत्व लक्षात नाही आलं?’ ‘अरविंद सावंत हिंदुत्व आणि खऱ्या शिवसेनेबाबत बोलत आहेत. हा शिवसेनेत कधी आला? मी 1966 चा शिवसैनिक आहे… (अरे बस खाली बस.. काय दम आहे.. बस खाली…’) ‘अरे पार्टी बनवायला पण ताकद लागते.. मी पक्ष सोडला ना.. तर या 220 लोकांना संरक्षण घ्यावं लागलं होतं. हे काय बोलतात आता.. आता काहीही वाचलं नाही.. आता काही शिल्लक नाही. जो काही आवाज येतोय ना.. तो मांजरीचा आवाज आहे.. तो वाघाचा आवाज नाही. ते संपले आहेत.’
आता त्यांना आमच्या पंतप्रधानांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही.. औकात नाही त्यांची, औकात नाही त्यांची.. आता आपलं पाहा महाराष्ट्रात काय उरलंय यांचं तिकडे डुबणार आहात.. तेच पाहा.. पण भाजप आणि पंतप्रधानजी आणि अमितजी शाह यांच्यावर बोट जरी उगारलं तर तुमची औकात मी काढेल.. काय खरं आहे ते मी बाहेर काढेल.. अशी एकप्रकारे धमकी वजा ईशारा राणेंनी यावेळी दिली.