(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपला पूरक असणाऱ्या वक्तव्यांवरून सध्या राजकारणात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. ईव्हीएम तसेच पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पदवीवरून पवार यांनी ठाकरे गट तसेच काँग्रेसच्या भूमिकेशी विसंगत भूमिका मांडली होती. यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटातील माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी यावर भाष्य केलं आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा जर भाजपसोबत गेली आणि आम्हाला तुम्ही आमच्यासोबत येऊ नका, असं सांगितलं जाईल… हे कदापि होणार नाही. मात्र तरीही असे झाल्यास आमचे मुख्यमंत्री सक्षम आहेत. आम्ही स्वबळावर देखील निवडणुका लढू शकतो” असं आनंदराव अडसूळ म्हणाले.
अडसूळ नेमके काय म्हणाले?
शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ म्हणाले की, भाजपा आम्हाला तुम्ही सोबत येऊ नका असे म्हणेल, असे वाटत नाही आणि म्हणाले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमचे मुख्यमंत्री इतके सक्षम आहे, की आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू शकतो. आनंदराव अडसूळ यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये काही ना काही मतभेद आहेत अशी चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
Post Views: 3,255