(दापोली)
बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून त्या माध्यमातून तरुणीला त्रास देणाऱ्याच्या मुसक्या दापोली पोलिसांनी आवळल्या आहेत. रमेश भागोजी कोरके (वय ३२, रा. कोरकेवाडी, कोलतावडे, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे.
११ सप्टेंबरला तालुक्यातील एका तरुणीला तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती व ती या मुलीची मैत्रीण असल्याने तिने लगेच ती स्वीकारली. काही वेळातच दोघांत संदेशांची देवाण-घेवाणही झाली. याच अकाउंटवरून तिला थोड्या वेळाने एक व्हिडिओ कॉल आला व या कॉलमध्ये एक अनोळखी व्यक्ती चेहरा न दाखवता अश्लील चाळे करून दाखवत असल्याचे दिसले. थोड्याच वेळात याच अकाउंटवरून या तरुणीचे तसेच या अनोळखीचे बनावट फोटो (मॉर्फ फोटो) तिला व तिच्या इतर मित्र-मैत्रिणींना पाठविले व सर्व बनावट फोटो व्हायरल करण्याबाबत धमकावले. या तरुणीने घडल्या प्रकाराबाबत मैत्रिणीच्या मोबाइलवर कॉल केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे व अकाउंट बनावट असल्याचे लक्षात आले. दापोली पोलिस ठाण्यात तरुणीने अनोळखी विरोधात व बनावट अकाउंटबाबत तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सायबर पोलिसांनी या गुन्ह्यामधील संशयित आरोपी रमेश भागोजी कोरके (वय ३२, रा. कोरकेवाडी कोलतावडे, ता. आंबेगाव जि. पुणे) याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांच्या सूचनेनुसार निरीक्षक विवेक अहिरे, उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, हवालदार शिवलकर व सातार्डेकर यांनी तपास करून संशयिताला ताब्यात घेतले आहे.
सोशल मीडियावरील माध्यमांचा वापर करताना तरुणांनी कोणत्याही अज्ञात विनंत्या अथवा लिंक्स क्लिक करू नयेत. आपल्या अकाउंट Settings & Privacy या नियमित अद्ययावत कराव्यात. तसेच ईमेल किंवा संदेशांद्वारे फिशिंगच्या प्रयत्नांपासून सावध राहा. संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा.
– धनंजय कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, रत्नागिरी.