( दापोली / प्रतिनिधी )
कोकणातील शेती, शेतीपूरक व्यवसाय व कष्टकरी शेतकरी यांच्याशी निगडित शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या व मागील वर्षी आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालक पदी डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांचे आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
याच विद्यापीठाचे पदवीधर असलेले व तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले डॉ. प्रमोद सावंत यांनी विद्यापीठाच्या विविध स्तरांवर काम केले आहे. सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, विद्यापीठाचे निम्नस्तर कृषी शिक्षण सहयोगी अधिष्ठाता, उद्यान विद्या महाविद्यालय, मुळदे, कुडाळ चे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव म्हणून डॉ. सावंत यांनी यशस्वीपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तर गेल्या वर्षी पार पडलेल्या विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील ‘सुवर्ण पालवी’ या राज्यस्तरीय पाच-दिवसीय प्रदर्शनाचे डॉ. सावंत मुख्य समन्वयक होते. सध्या ते कृषी महाविद्यालय, दापोली चे विस्तार शिक्षण विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.
विद्यापीठाच्या निरनिराळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना डॉ. सावंत यांनी नवनिर्मितीची कास धरली आणि आपल्यातील कौशल्यपूर्ण नेतृत्व व कर्तुत्वाने आपल्या कामात वेगळेपणाची छाप पाडली.
नवीन जबाबदारीच्या माध्यमातून कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी व विद्यापीठाची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले व कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी विस्तार शिक्षण संचालक पदी आपली नियुक्ती केल्याबद्दल डॉ. सावंत यांनी कुलगुरू महोदयांचे आभार मानले. तसेच विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. आनंद नरंगळकर, संशोधन केंद्रांचे प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, संशोधक, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने व समन्वयाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे विस्तार कार्य शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.