(रत्नागिरी)
अवकाळीमुळे यंदा जिल्ह्याला टंचाईची झळ कमी बसली आहे. सध्या खेड, चिपळूण, लांजा या 3 तालुक्यातील 11 गावांमधील 11 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा चालू झाला आहे. 1 हजार 83 लोकांना टंचाईची झळ बसत आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात 67 गावातील 113 वाड्यांमध्ये टँकर होता. मागील दोन वर्षाच्या तुलनेत टंचाईच्या गावांची आकडेवारी अवघी नगण्य आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाचा मार्च महिना अति तीव्र उन्हाचा गेला आहे. पहिल्या दिवसांपासून अखेरपर्यंत उन्हाचा कडाका जाणवत होता. पारा 39 अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे प्रचंड उष्मा जाणवत आहे. ही परिस्थिती असतानाही यंदा रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईचा आगडोंब उसळलेला नाही.
यावर्षी मोसमी पाऊस उशिरापर्यंत होता. ऑक्टोबरला परतीचा पाऊस सुरु झाला. पुढे प्रत्येक महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी नद्या, नाल्यांचे पाणी फेब्रुवारी महिन्यांपर्यंत प्रवाहीत होते. पात्र सुखलेले नव्हते. उन्हाचा कडाका वाढला तरीही पाणी पातळी तेवढी खालावलेली नव्हती. भुजल विभागाकडूनही याबाबत जिल्हाप्रशासनाला सुचना केलेल्या होत्या.
दरवर्षी या कालावधीत टंचाईची तिव्रता अधिक जाणवत असते. 2020 मध्ये 83 गावातील 165 वाड्यांना 14 टँकर पाणी पुरवठा करत होते. 2021 मध्ये हा आकडा कमी झाला आणि 67 गावातील 113 वाड्यांना 15 टँकरने पाणी दिले जात होते. यंदा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नऊ पैकी तिनच तालुक्यांना टंचाईची झळ बसत आहे. 11 गावातील 11 वाड्यांना 3 टँकरने पाणी पुरवठा होत आहे. याचा आधार 1 हजार 83 लोकांना मिळाला आहे. तिन वर्षांचा विचार करता ही आकडेवारी दिलासादायक असून मे महिन्यातही तेवढी तिव्रता जाणवणार नाही असा जाणकारांचा अंदाज आहे.