(डॉ अतुल ढगे)
राजेश, वय २४ वर्षे, खुर्चीमध्ये अमिताभ स्टाईलमध्ये रेलून बसला होता. सर मी पुढच्या महिन्यात फोर्डची शोरूम चालू करणार आहे आणि नंतर फोर्डची कंपनी काढणार आहे. माझे सगळ्या बँकेत अकाउंट आहेत आणि करोडो पैसे आहेत. सगळ्या पक्ष्याचे नेते मला ओळखतात. मोठ्या ऐटीत तो बोलत होता. त्याच्याविरुद्ध घरचे काही बोलले कि चिडचिड करत होता. मधेच गाणी म्हणत होता. रंगीबेरंगी शर्ट आणि डोक्यावर गॉगल होता. त्याला बाजूला बसवून वडिलांकडून माहिती घेतली. त्यांनी सांगितले, मागील काही दिवसांपासून तो अशाच मोठ्या गप्पा करतो आहे. रात्री झोपत नाही, ३ वाजताच उठून व्यायाम करतो व बॉडीबिल्डर होणार म्हणतो तर 2-३ तासाने अजून दुसरेच काही. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांशी वायफळ बडबड करत बसतो, मधेच लहर आली कि इंग्लिशमध्ये तर कधी हिंदीमध्ये बोलायला लागतो. घरी असणाऱ्या वस्तू परत परत विकत आणतो. गाडी फास्ट चालवतो. पूर्ण माहितीवरून त्याला मॅनिया (उन्माद अवस्था) असल्याचे निष्कर्ष काढून औषधोपचार केला. १५-२० दिवसात बरीच सुधारणा दिसून आली व एक दोन महिन्याला फॉलो अप ठेऊन गोळ्या चालू ठेवण्याचा सल्ला दिला.
बऱ्याच वेळी आपल्याला अशा व्यक्ती भेटतात ज्या खूप विश्वासु व ध्येयवादी असतात. त्यांची स्वप्ने खप मोठी असतात. त्यांचे आपल्याला कौतुक वाटते आपण त्यांना प्रोत्साहन देतो. पण प्रत्येक व्यक्तीबद्धलच असे वाटत नाही. काही वेळा आपल्याला कळते की ही व्यक्ती नेहमीच अशी बोलत नाही. आताच ती अशी मोठ्या ध्येया बद्धल आहे परंतु त्यांचे ध्येयही तासाला किंवा दिवसाला बदलत असते. कधी हे तर कधी ते. बोलण्यातही अति आत्मविश्वास व एवढ्या मोठ्या गोष्टी की कुठेतरी वाटते की काही तरी बिनसले आहे,काही तरीप्रॉब्लेम आहे. काही वेळा तर ही व्यक्ती दुसरे टोक गाठतात ज्यामध्ये ते एवढे निराशावादी असतात की त्यांना जगायचं कशाला असे वाटत असते. आत्मविश्वास राहत नाही. काही करावे वाटत नाही. होय हा मानसिक प्रॉब्लेम असू शकतो. त्या व्यक्तीस बायपोलर मूड डिसऑर्डर म्हणजेच द्विध्रुवीय अवस्था हा आजार असू शकतो .
३० मार्च म्हणजे जागतिक बायपोलर मूड डिसऑर्डर दिवस. बायपोलार मूड डिसऑर्डर म्हणजेच द्विध्रुवीय अवस्था आजार या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम साजरे केले जातात , विविध ऍक्टिव्हिटी आयोजित केल्या जातात. ३० मार्च म्हणजे प्रख्यात जागतिक चित्रकार विन्सेट वॅन गॉग यांचा वाढदिवस. विन्सेट वॅन गॉग यांना बायपोलार मूड डिसऑर्डर हा आजार होता. त्यामुळे त्यांच्या वाढदिवस दिवशी म्हणजे ३० मार्चला बायपोलार मूड डिसऑर्डर दिवस म्हणून पाळला जातो. द्विध्रुवीय अवस्था तसा खूप मोठ्या प्रमाणात आढळणारा आजार आहे. या आजाराबाबत असलेले गैरसमज व कलंकित भावना दूर करणे हे ही महत्वाचे आहे. आजही अनेक लोक रुग्णाच्या या आजाराच्या वागण्याला दैवाशी, करणीशी जोडतात व उपचार करण्याऐवजी भगत, गुरव, दैवर्षी, मौला अशा लोकांकडे घेऊन जातात व सुरुवातीचा उपचाराचा महत्वाचा वेळ घालवतात व वेळेत उपचार आजार न भेटल्यामुळे हे आजार चिवट व कायमस्वरूपी होऊन जातात. म्हणूनच याबाबतीत जनजागृती करण्यासाठी हा दिवस.
बायपोलर मूड डिसऑर्डर म्हणजे काय ?
बायपोलर मूड डिसऑर्डर ( बाय म्हणजे दोन , पोलार म्हणजे ध्रुव म्हणजे दोन विरुद्ध टोक) म्हणजे दोन विरुद्ध टोकाचे मूड, क्रिया व बोलणे असलेला आजार होय. अगदीच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर “कभी खुशी कभी गम”. म्हणजे हा आजार असलेल्या व्यक्तीच्या मूडमध्ये, एनर्जी लेव्हलमध्ये, बोलण्यामध्ये शारीरिक क्रिया/ हालचाली व दैनंदिन क्रियांमध्ये टोकाचे बदल होत राहतात. हे बदल वर्षांमध्ये होऊ शकतात, महिन्यात होऊ शकतात किंवा काहीजणांत तर अगदी आठवड्यात किंवा दिवसभरात दोन्ही टोकाची लक्षणे दिसू शकतात.
ज्यावेळी व्यक्तीचा मूड व एनर्जी जास्त असते किंवा अतिप्रमाणात असते त्याला मॅनिक एपिसोड ( उन्माद अवस्था ) म्हणतात. ज्यावेळी व्यक्तीचा मूड व एनर्जी लेवल कमी असते किंवा तळाला असते तेंव्हा त्यास डिप्रेसीव एपिसोड ( नैराश्य अवस्था ) असे म्हणतात.
उन्मदाच्या अवस्थेमध्ये व्यक्तीला अतिप्रमाणात खुश वाटते. व्यक्ती स्वतःबद्धल मोठे विचार करते. स्वतःला मोठे समजते. मोठ्या मोठ्या गोष्टी (बाता) करते. मी देव आहे, मी हिरो आहे, माझ्याकडे खूप पैसे आहेत इ. झोप कमी होते. ( कमी झोपते , झोपेची गरज नाही असे वाटते, थोडीशीच झोप पुरेशी आहे असे वाटते) नेहमीपेक्षा जास्तीची बडबड करते, अनोळखी लोकांशी जास्तीच्या गप्पा मारते, सतत बोलत राहते. इंग्लिशमध्ये बोलायला चालू करते. सतत विषय बदलते ज्यामुळे तो काय बोलतोय ते कळत नाही. जास्तीचे प्लांनिंग करते,क्रिया करते. मूर्खपणें बिजनेसमध्ये पैसे गुंतवते, विनाकारण खर्च करते, उधळपट्टी करते. अचानक समाज सेवा करायला लागते. मानसिक विचार व शारीरिक क्रियांची गती वाढते , नाचते, गाणी म्हणते. धोकादायक क्रिया करते (दारू किंवा इतर व्यसन चालू करणे किंवा वाढवणे, लग्नबाह्य संबंध, अतिवेगाने गाडी चालवणे इ).
याविरुद्ध नैराश्येच्या अवस्थेत रुग्णाला मनामध्ये नेहमी खिन्न निराश व उदास वाटते. रुग्णाचा स्वभाव चिडखोर होतो. छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड होते.
दैनंदिन गोष्टी, आवडी निवडी छंद यामधील कुठल्याच गोष्टीत मन / लक्ष लागत नाही अथवा त्या गोष्टी कराव्याशा वाटत नाहीत. रुग्णाला स्वतःहून कोणाशी बोलावे, लोकांत मिसळावे काही करावे असे वाटत नाही. याउलट त्या गोष्टी ते टाळतात. भूक लागत नाही, खायची इच्छा होत नाही. झोप उशिरा लागते. झोप लागण्यापूर्वी अंथरुणावर तळमळत राहतो.व्यसन चालू करतात किंवा पूर्वीच्या व्यसनात वाढ होते. आत्मविश्वास नाहीसा होतो. आपण काहीच करू शकत नाही, आपला काहीच उपयोग नाही, आपली कुणीच मदत करू शकत नाही, आपल्या आयुष्यात पुढे काहीच चांगले होणार नाही अशी भावना व विचार नेहमी मनात येत राहतो. वरील विचार मनात आल्यावर आपल्या जगण्यात काही अर्थ नाही असा विचार करून आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतात व आत्महत्या करतात.
का होतो बायपोलार मूड डिसऑर्डर ?
- मेंदूमधील डोपामिन केमिकल वाढल्यामुळे ती व्यक्ती मॅनिया अवस्थेमध्ये जाते तर सिरोटोनिन,डोपामिन,एपिनेफ्रिन,नॉरएपिनेफ्रिन कमी झाल्यामुळे नैराश्याच्या अवस्थेतजाते.
- मेंदूचा आजार,मेंदूमधील गाठ,मेंदूला लागलेला मार किंवा विविध व्यसनामुळे (दारू,चरस,गांजा इ.) मुळे सुद्धा हा आजार होतो.
- मानसिक ताण-तणाव हे मुख्य कारण असले तरी बऱ्याच वेळी मानसिक ताण-तणाव नसताना आनुवंशिकते मुळेकुटुंबात यापूर्वी कोणाला हा आजार झाला असल्यास व्यक्तीस हा आजार होण्याची शक्यता राहते.
शक्यतो १५ ते२५ च्या दरम्यान या आजाराची सुरवात होते.
हा आजार त्या व्यक्तीच्या आयुष्यात सर्वच गोष्टीवर परिणाम करते. नातेसंबंधावर, त्याच्या कामावर, त्याच्या दैंनदिन जीवनावर सर्वच गोष्टीवर परिणाम करते. हा आजार लवकर लक्षात येत नाही, दिसून येत नाही, लोकांना,नातेवाईकांना लवकर समजत नाही. बायपोलार मूड डिसऑर्डर असलेल्या व्यक्तीमध्ये ५ पैकी १व्यक्ती ही आत्महत्येमुळे मृत पावते. सुरवातीच्या काळात लक्षणे सौम्य असली तरी उपचार न भेटल्यास हा आजार तीव्र स्वरूपाचा होऊन व्यक्ती स्वतःच्या जीवास, इतरांच्या जीवास धोका करू शकतात किंवा संपत्तीचे नुकसान करू शकतात.
या आजारावर उपचार काय असतात ?
उपचारामध्ये औषधोपचार, विद्युत उपचार, मानसोपचार व पुनर्वसन या गोष्टींचा समावेश करावा लागतो.
औषधोपचारामध्ये मूड स्टेबिलायझर्स, अँटी-सायकोटिक्स, अँटी-डिप्रेसन्ट्स इत्यादी चांगली औषधे उपलब्ध आहेत(फक्त झोपेच्या गोळ्या नव्हे). लवकरात लवकर व नियमित व वेळेत औषधोपचार पूर्ण केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.
पहिल्या वेळेस आजार झाल्यास व्यक्तीस 6 ते 8 महिने नियमित औषधोपचार करणे गरजेचे असते तर दुसऱ्या वेळेस आजार झाल्यास 2 ते 5 वर्षे औषधोपचार करावा लागू शकतो. परंतु बरेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक हा औषधोपचार पूर्ण करत नाहीत व अशा वेळी मात्र रुग्णाच्या आजाराचे स्वरूप डायबेटीस, अति रक्तदाब या सारख्या क्रोनिक आजारात रूपांतर होते व मग मात्र रुग्णाला आयुष्यभर उपचार चालू ठेवावे लागू शकतात.
औषधोपचारासोबतच त्याला मानसोपचाराची जोड देणे गरजेचे असते. रुग्णास व नातेवाईकास आधार देणे , शिक्षित करणे स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे गरजेचे असते. रुग्णास आधार देणे, आजाराविषयी शिक्षित करणे, त्याच्या कुटुंबास मार्गदर्शन करणे यासाठी कॉऊन्सलिंग गरजेचे असते. नैराश्याच्या वेळी सीबीटी,आरईबीटी इ. सायकोथेरपीचा वापर करावा लागू शकतो.
ECT (विद्युत उपचार पद्धती) ज्याला साध्या भाषेत शॉक ट्रीटमेंट म्हणतात. हा खूप चांगला व रामबाण उपचार आहे. रुग्ण औषधोपचार घेत नसेल, स्वतःस किंवा इतरांस इजा करत असेल किंवा औषधोपचाराचा म्हणावा तेवढा फायदा होत नसेल तरच ECT उपचार वापरावा लागतो. सर्वच रुग्णांना याची गरज पडत नाही. परंतु आजही या रामबाण उपचाराबाबतीत लोकांत बरेच गैरसमज आहेत.
रुग्णांनी काय काळजी घ्यायला हवी ?
१. व्यवस्थित व नियमित औषधे घ्यावीत.
२. नियमितपणे ( कमीत कमी तीन महिन्यातून एकदा ) मनोविकारतज्ञांचा सल्ला घ्यावा. आहे ती औषधे वर्षनुवर्षे स्वतःहून घेणे टाळावे.
३.व्यवस्थित व शांत व पुरेशी झोप होणे आवश्यक.
४.संतुलित,पुरेसा व वेळेवर आहार घ्यावा. उपवास करू नयेत.
५.ताण -तणावाचे व्यवस्थित नियंत्रण व व्यवस्थापन करण्यास शिकावे.
६.कॅफेन,सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ,दारू तसेच इतर अमली पदार्थ टाळावेत/वर्ज्य करावेत.
७.दररोजचे वेळापत्रक बनवावे.
८.दररोज कमीत कमी ३०मिनिटें कुठलाही व्यायाम करावा.
डॉ अतुल ढगे,
मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिकसमस्या तज्ञ व व्यसनमुक्तीतज्ञ.
माईंडकेअर हॉस्पिटल, रत्नागिरी
www.mindcareonline.com