(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड माध्यमिक विद्यामंदिर येथील विज्ञान व गणित विषयाच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. मानसी बिपीन विचारे (आरती देसाई ) यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी मुंबई येथे उपचारादरम्यान आज सोमवार दि. १० एप्रिल रोजी सकाळी दुःखद निधन झाले.
मानसी विचारे या माध्यमिक विद्यामंदिर जयगड विद्यालयात गेली २० वर्ष विज्ञान व गणित विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. काही दिवस आजारी असल्यामुळे त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्याने त्यांचे मुंबईत दुःखद निधन झाले. गणित व विज्ञान विषयांवर त्यांचे कमांड होते. सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या, शिक्षक, पालक, विद्यार्थीप्रिय असलेल्या मानसी विचारे यांच्या निधनाबद्दल जयगड विद्यालयासह संपूर्ण तालुक्याच्या शिक्षण विभागातून हळहळ व्यक्त होत आहे. मनमिळावू, अभ्यासू, हजरजबाबी, उत्तम वक्त्या, उत्कृष्ट अध्यापन शैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रभावी वैशिष्ट्ये होती.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माजी सभापती शुभांगीताई देसाई यांची ती मुलगी होत.
विद्यार्थी दशेपासून ओरी गावातील अतिशय हुशार विद्यार्थीनी म्हणून आरती देसाई यांची ओळख होती. गुहागर तालुक्यातील पोमेंडी हे त्यांचे सासरचे गाव. त्यांचे पती बिपीन विचारे हे प्राथमिक शिक्षक म्हणून रत्नागिरी तालुक्यात सांडेलावगण येथे कार्यरत आहेत. त्यांना दोन मुलं असून दोन्ही मुलांचे शिक्षण सुरू आहे. त्यांच्या पश्चात पश्चात पती, दोन मुलं, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे.