(पणजी)
विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे व ती वृद्धिंगत करण्याचे कार्य जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान अतिशय व्यापकपणे करत आहेत. त्यांचे गोव्यातील कार्य दखलपात्र आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ओल्ड गोवा येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी संतपीठावर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज उपस्थित होते. संस्थानच्या उपपीठ गोवा तर्फे काल सोमवारी त्रिपुरारी पौर्णिमा सोहळा उत्साहात झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या सोहळ्यात सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून गोवा येथील गरजू महिलांना उदरनिर्वाहासाठी १६ घरघंट्यांचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मी या सांप्रदायाशी बऱ्याच वर्षांपासून जोडला गेलो आहे. सर्व प्रथम जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांच्या पुढाकारातून वास्को येथे रक्तदान शिबीर झाले. त्यावेळी मी डॉक्टर या नात्याने रुग्णतपासणी केली होती. त्यानंतर सातत्याने मी या सांप्रदायाशी जोडलो गेलो. आज हा स्व -स्वरूप सांप्रदाय कार्यरूपाने कितीतरी पुढे गेला आहे, या सांप्रदायातर्फे समाजासाठी विविध उपक्रम राबविले जातात. एव्हढेच नसून पुरग्रस्तांना मदत, गरीब शेतकऱ्यांना गाय, म्हैस, शेळ्याचं वाटप, चाऱ्याचे वाटप करण्यात येते. संस्थानची रुग्णवाहिका सेवा उपयुक्त आहे. असे अनेक उपक्रम जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान राबवित आहे. या पुढे माझ्या सरकारकडून जेवढी मदत करता येईल तेवढी करणार आहे.”
यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आमदार संकल्प आमोणकर, आमदार जीत आरोलकर, आमदार केदार नाईक यांची भाषणे झाली. यावेळीं वास्कोचे आमदार श्रीकृष्ण उर्फ दाजी साळकर, कुंभार जुवाचे आमदार राजेंद्र फळदेसाई, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वंदरेचे जित अलोरकर, ओल्ड गोवा सरपंच सेन्द्रा पिदादी गोंसालविस, मये मतदारसंघाचे प्रेमेंद्र शेट आदी उपस्थित होते.
यावेळी त्रिपुरारी पौर्णिमेचे निमित्ताने दीपोत्सव करण्यात आला. मंदिरासमोरील दीपमाळ शेकडो दिव्यांनी प्रज्वलित करण्यात आली मंदिराचा अवघा परिसर दिव्यांनी उजळून निघाला होता. तसेच याग, पालखी परिक्रमा या कार्यक्रमाबरोबरच जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे प्रवचन झाले. संपूर्ण गोवा, तसेच महाराष्ट्रातून ही हजारो भक्त या सोहळ्यासाठी आले होते.