(नाणीज)
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मरणोत्तर देहदान उपक्रमांतर्गत २९ वे देहदान नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे झाले. येथे निधन झालेल्या कै. सुमनबाई सुखदेव शिंदे यांचे पार्थिव त्यांच्या इच्छेनुसार लोणीच्या बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाकडे सोपविण्यात आले.
या बाबतची माहिती अशी, जगद्गुरु श्रींच्या भक्त कै. सुमनबाई सुखदेव शिंदे यांचे १६ सप्टेंबर २०२२ रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पुत्र दत्तात्रय सुखदेव शिंदे, संपत सुखदेव शिंदे व मुलगी सरस्वती अस्वले यांनी सुमनबाईं यांचा देह वैद्यकीय महाविद्यालायाच्या शरीरशास्त्र विभागाकडे सुपूर्द केला.
जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी मृत्यूनंतरही देहदान करून समाजाच्या उपयोगी पडण्याचे आवाहन केले होते. मरणानंतर देह मातीमोल होण्यापेक्षा त्याचा उपयोग वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, अर्थात भावी डाक्टरर्सना शरीरशास्त्र शिकण्यासाठी होऊ शकतो. या भूमिकेतून महाराष्ट्रातून ६५ हजार जणांनी मरणोत्तर देहदानाचे अर्ज भरून दिले होते. सुमनबाई यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मरणोत्तर देहदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत संस्थानकडे अर्ज भरून दिला होता. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रेरणेतून झालेले आत्तापर्यंतचे हे २९ वे देहदान आहे. कै. सुमनबाई यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपुर्द करण्यात आला.
यावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदायाचे अहमदनगर जिल्हा सेवाध्यक्ष व्यंकटेश बाप्पा तसेच श्री खांडगे, सयाजी भडांगे, अशोक शिंदे, सोमनाथ येवल, प्रदीप दंडवते व अहमदनगर जिल्ह्यातील इतर पदाधिकारीही उपस्थित होते.
फोटो –
अहमदनगर लोणी येथील कै. सुमनबाई यांचे पार्थिव वैद्यकीय महाविद्यालायाकडे सुपूर्द करताना त्यांचे नातेवाईक, स्व स्वरूप संप्रदायाचे पदाधिकारी.