(राजापूर)
राजापूर तालुक्याच्या पश्चिम भागात महिला सक्षमीकरण चळवळी अंतर्गत त्रिवेणी संघाच्या माध्यमातून सुमारे 2000 पेक्षा जास्त महिला संघटित झालेल्या आहेत. या महिलांचे नेतृत्व करणाऱ्या त्रिवेणी संघाच्या महिला पदाधिकाऱ्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी संघ कार्यालयात भेट घेत सर्व महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी या पुस्तिका भेट स्वरूपात दिल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेले महिलांची सुरक्षितता आणि महिलांविषयीच्या कायद्याची माहिती असलेली निर्भया ही पुस्तिका रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात वितरित करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सागरी पोलीस ठाणे नाटेच्या कार्यक्षेत्रातील विविध ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आदींसह महिला पदाधिकाऱ्यांना या पुस्तिकेचे वाटप केले जात आहे.
आज त्रिवेणी महिला संघाच्या सभेदरम्यान महिलांविषयीचे कायदे आणि सुरक्षितता याविषयी पाटील यांनी मार्गदर्शन करतानाच पोलिसांच्या वतीने या निर्भया पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. या महिला पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून क्षेत्रातील विविध गावात बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून या पुस्तिकेतील माहिती पोहोचविण्याचे काम या महिला पदाधिकारी करणार आहेत.
या कार्यक्रम प्रसंगी चैतन्य संस्था त्रिवेणी संघाच्या सचिव नैशदा गिरकर, सहसचिव रेशम लाड, संघ पदाधिकारी सुषमा पांचाळ, वंदना जाधव, स्मिता नार्वेकर’ दीक्षा वाडेकर दर्शना करगुटकर, श्वेताली तीर्लोटकर, सोनल आडीवरेकर, सुप्रिया दळवी राजश्री पांचाळ, व्यवस्थापक राजन लाड कार्यकर्त्या प्रज्ञा भडेकर, प्रतिभा मोहिते, संगीता बाणे आदी उपस्थीत होते.