(अहमदाबाद)
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आयपीएलच्या अंतिम लढतीत रवींद्र जडेजाने दोन चेंडूवर षटकार आणि चौकार ठोकून चेन्नईला जेतेपद मिळवून दिले. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना १५ षटकांचा झाला. त्यासाठी चेन्नईसमोर १७१ धावांचे आव्हान होते. चेन्नईची सुरुवात चांगली झाली. परंतु त्यानंतर एकानंतर एक फलंदाज बाद होत गेल्याने आव्हान निर्माण झाले होते. मात्र, मोक्याच्या क्षणी अंबाती रायडूने केलेली फटकेबाजी आणि त्यानंतर अखेरच्या २ चेंडूवर जडेजाने लगावलेला षटकार आणि चौकार यामुळे चेन्नईने विजयश्री खेचून आणली. चेन्नईने पाचव्यांदा जेतेपद पटकावत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली. त्यानंतर पिवळ्या वादळाने एकच जल्लोष केला. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव केला. सीएसकेच्या विजयाचा हिरो ठरला तो रवींद्र जडेजा. एमएस धोनीच्या टीम चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत धोनीने आता रोहित शर्माची बरोबरी केली आहे.
चेन्नई संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. गुजरातकडून हे षटक टाकण्याची जबाबदारी मोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. तर क्रीजवर शिवम दुबे होता. मोहितने पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. यानंतर ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर फक्त १ धाव आली. आता चेन्नईला ४ चेंडूत १२ धावांची गरज होती. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर १-१ धावा आली. आता सीएसकेला विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूंवर १० धावांची गरज होती. तेव्हा रवींद्र जडेजा क्रीजवर होता. त्याने मोहित शर्माच्या चेंडूवर प्रथम षटकार आणि नंतर चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला.
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईपुढे विजयासाठी २१५ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात पावसाचे आगमन झाले. त्यावेळी चेन्नईची बिन बाद ४ अशी अवस्था होती. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमांनुसार चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे आव्हान देण्यात आले. मैदानात परतल्यावर ऋतुराज गायकवाडने चौकारासह गुजरातचे स्वागत केले. त्यानंतर ऋतुराज आणि डेव्हॉन कॉनवे यांनी दमदार फलंदाजी केली आणि संघाला विजयाची आशा दाखवली. पण पॉवर प्लेनंतर हे दोघेही बाद झाले. त्यानंतर अजिंक्य राहणे दमदार फलंदाजी करून बाद झाला. महेंद्रसिंग धोनी तर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे संघ अडचणीत आला होता. त्यावेळी दुबे खिंड लढविण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु मोठे फटके मारता आले नाहीत. त्यामुळे अखेरच्या २ चेंडूंवर विजयासाठी १० धावा आवश्यक होत्या. त्यावेळी जडेजाने अखेरच्या दोन चेंडूवर प्रथम षटकार आणि त्यानंतर चौकार खेचून विजयश्री खेचून आणत पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावून मुंबई इंडियन्सची बरोबरी केली.
तत्पूर्वी साई सुदर्शनच्या झंझावाती ९६ धावांच्या बळावर गुजरातने निर्धारित २० षटकात चार विकेटच्या मोबदल्यात २१४ धावांपर्यंत मजल मारली होती. साई सुदर्शनशिवाय वृद्धीमान साहाने ५४ धावांचे योगदान दिले. सुरुवातीला वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी वादळी सुरुवात केली. या जोडीने ६७ धावांची सलामी दिली. रविंद्र जडेजाने शुभमन गिलला बाद करत ही जोडी फोडली. शुभमन गिलने २० चेंडूत ३९ धावांचे योगदान दिले. दुस-या बाजूला वृद्धीमान साहानेही फटकेबाजी केली. त्यानंतर साई सुदर्शनचा झंझावात सुरू झाला. त्याने चौफेर फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडला. त्यात साहा ५४ धावांवर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शनने हार्दिक पांड्याच्या साथीने फटकेबाजी केली. सुदर्शनही ९६ धावांवर बाद झाला. सुदर्शनच्या फटकेबाजीमुळे गुजरातने २१४ पर्यंत मजल मारली होती. मात्र, सुदर्शनची खेळी व्यर्थ ठरली.
जेतेपद धोनीला समर्पित – जडेजा
रवींद्र जडेजाने गुजरातच्या भूमीत अखेरच्या दोन चेंडूवर चेन्नई सुपरकिंग्जला विजय मिळवून दिला. त्यानंतर आनंद व्यक्त करीत त्याने हा विजय संघाचा कर्णधार एम. एस. धोनीला समर्पित करीत असल्याचे सांगितले.