( चिपळूण / प्रतिनिधी )
तालुक्यातील वहाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास पावणे दोन कोटीचा अपहार करणाऱ्या लीपिकाला दीड महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे. दृष्यंत शहाजी तिरमारे असे त्याचे नाव आहे.
दृष्यंत तिरमारे हा वहाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदावर आहे. त्याच्याकडून वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दोन वर्षापासून अपहाराचा प्रकार सुरू होता. कर्मचारी वेतन बिलातून तो दर महिन्याला 10 लाखांची रक्कम कट करत होता. ही रक्कम त्याने स्वतःच्या बँक खात्यात जमा केली होती. जमा केलेली रक्कम त्या त्या महिन्यात त्याने संपवून टाकली. अनेकांना त्याने लाखोंच्या रकमा चेक द्वारे दिल्या.
दरम्यान नियमित वेतन अदा करताना ती अपुरी पडत होती. जवळपास 1 कोटी 63 लाख 69 हजार एवढी रक्कम जाते कुठे याची आरोग्य केंद्रातून चौकशी लागली. यावेळी सारा प्रकार समोर आला. तिरमारे याच्या अकाऊंट वर रक्कम जात असल्याचे लक्षात आले. त्याने अपहार केल्याचे लक्षात आल्यानंतर येथील अधिकारी डॉ. ज्योती सदानंद जाधव यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच तीरमारे फरार झाला. गेले दीड महिना पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे पोलिस ही हताश झाले होते. अखेर बुधवार 7 डिसेंबर रोजी दृष्यंत तिरमारे याला पोलिसांनी खेर्डी येथून ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 12 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.