छोट्या बालकांना खेळण्या-बागडण्यासाठी चिपळूण नगरपरिषदेने उभ्या केलेल्या उद्यानांची दुरावस्था झाली आहे. या उद्यानाकडे महिनो-महिने कंत्राटी कामगार फिरकलेच नाहीत, असे समोर येत असून या प्रकाराला जबाबदार कोण ?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चिपळूण नगरपरिषदेने कोट्यवधी रुपये खर्च करून उद्याने उभी केली आहेत. मात्र, या उद्यानांची गेल्या काही वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी सानेगुरुजी उद्यानाचे सुशोभीकरण करून गेल्या महिनाभरापूर्वी लोकार्पण सोहळा देखील झाला आहे. मात्र, उद्घाटन खर्चावरून देखील सानेगुरुजी उद्यानाचा लोकार्पण सोहळा गाजत आहे. तर दुसरीकडे उर्वरित उद्यानाची दुरवस्था झाली आहे. यामध्ये उद्याने मद्यपींचे अड्डे बनले असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. खर तर पावसाळ्यात उद्याने बंद असतात. प्रत्येक उद्यानाला १ याप्रमाणे ६ कंत्राटी आहेत. तरी पाग येथील उद्यान वगळता इतर कुठल्याही उद्यानात कामगार बऱ्याच महिन्यात कामगार फिरकले नसल्याचे तेथील परिस्थीती पाहताआणि आजुबाजूच्या लोकांकडून माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे नगर परिषदेचे ६ कामगार फक्त कागदावरच आहेत की काय असा सवाल उपस्थित होत आहे. .
उद्याने बंद ठेवण्याचा आदेश होता , तरीही उद्याने सुरू होती. तर रात्रीही ही उद्याने खुलीच आणि गेटना लाॅक करणारे गायबच असल्याने कोणीही कधी आतमध्ये जातो आणि बाहेर येतो, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे.
याबाबत नगरसेवक अविनाश केळस्करयांनी माहिती देताना सांगितले की, आपण सलग १ आठवडा उद्यानांमधे वेगवेगळ्या वेळी जाऊन पहाणी केली तरीही एकही कामगार निदर्शनास पडला नाही. तसेच कंत्राटी कामगारांची नमूद नावे आहेत चौकशी केली असता त्यापैकी कुणीच कधीच कामावरच आले नाही, असे समोर आले आहे. यावरून पालीकेत नक्की चाल्लय तरी काय ? असा सवाल अविनाश केळस्कर यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर ते पुढे म्हणतात की, उद्याने आता बंद आहेत म्हणून अस्वच्छता असे म्हणणे असेल तर ६ कामगार नक्की काय करतात ? .साने गुरूजी उद्यान बंद आहे पण कामगार मात्र नाहीच. पाग येथील उद्यानात कधी एक, कधी २ कामगार असतात. परंतू इतर ठिकाणी कुणीही नसतेच. कन्या शाळा उद्यान, शंकरवाडी उद्यान, रामतिर्थ येथील मोरे घरासमोरील उद्यान, दुर्गेआळीतील उद्यान, बहादुरशेख येथील मिनाताई ठाकरे उद्यान,सर्व उद्याने दिवसरात्र खुली आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. एकंदरीत बालकांना खेळण्या- बागडण्यासाठी असलेली उद्यानांची दुरवस्था झाली आहे याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे