अरुणाचलच्या तवांगमध्ये झालेल्या चकमकीनंतर जेव्हा चिनी सैनिक पळून गेले, तेव्हा त्यांनी आपले बरेच सामान मागे तसेच टाकत पळ काढला. भारतीय जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून स्लीपिंग बॅग आणि इतर उपकरणे आणि साहित्य जप्त केले. त्याचा फोटोही समोर आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ज्या स्लीपिंग बॅग सापडल्या आहेत, त्या थंड तापमानात किंवा खुल्या जागेत राहण्यास मदत करतात.
तवांगच्या यांगत्से येथील तात्पुरत्या भिंतीवरील तारकुंपण तोडून ६०० चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देत त्यांचा पिटाळून लावले. दरम्यान, हवाई दल १५-१६ डिसेंबर रोजी एलएसीवर युद्ध सराव करेल. यामध्ये राफेल, सुखोईसह फ्रंटलाइन लढाऊ विमानांचा सहभाग असेल. ते ४८ तास ईशान्येतील तेजपूर, जोरहाट, चाबुआ आणि हाशिमारा एअरबेसवरून उड्डाण करतील. हा युद्ध सराव आधीच ठरल्याचे बोलले जात आहे.
तवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने अरुणाचल सीमेवर लढाऊ हवाई गस्त सुरू केली आहे. तवांगमधील चकमकीपूर्वीही चीनने अरुणाचल सीमेवर आपले ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर भारतीय वायुसेनेने तातडीने आपले लढाऊ विमान अरुणाचल सीमेवर तैनात केले होते.
गेल्या वर्षी याच भागात २०० चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. तेव्हाही भारतीय जवानांनी तो हाणून पाडला होता. त्यानंतर गस्तीदरम्यान दोन्ही देशांचे सैनिक सीमेवरील वादावरून आमनेसामने आले आणि काही तास हा प्रकार चालला. मात्र, यामध्ये भारतीय जवानांना कोणतीही हानी झाली नाही आणि प्रोटोकॉलनुसार चर्चेने वाद मिटवण्यात आला.