चिपळूण शहरानजीकच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री एम पेपर मिल कंपनीला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये कंपनीचे १६ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याची माहिती व्यवस्थापक श्री. स्वामी यांनी दिली.
तौक्ते चक्रीवादळाचा चिपळूणलाही फटका बसला आहे. रविवारी व सोमवारी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडत होता. यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात झाडे उन्मळून पडून वीज पुरवठा खंडित झाला तर काही ठिकाणी घरे, गोठे व शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. यामध्ये खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री एम पेपर कंपनीलाही चक्रीवादळाचा फटका बसला आहे. कंपनीच्या शेडचे एसी शीट, जीआय शीट्स खराब झाले आहेत. तसेच कटर मशीन व क्रेन डीएसएल बुश बार सिस्टीम खराब झाली आहे. ड्राईव्ह, मोटर्स आणि बॉयलर फर्नेस, ईएसपी आणि मुख्य स्टीम लाईन इन्सुलेशनही नादुरुस्त झाले आहे. एकंदरीत कंपनीचे १६ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. इतका या कंपनीला चक्रीवादळाचा फटका बसला आहे.