(रत्नागिरी)
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च अखेर २५ लाख १ हजार रुपयांचा नफा मिळवला आहे. एक पाऊल आर्थिक सक्षमतेकडे हे आपले ब्रीदवाक्य सिद्ध केले आहे. ग्राहकांचा विश्वास जपत पतसंस्था अधिक उत्तम अर्थकारण नवनवीन योजना राबवून पार पाडेल, अशी माहिती अध्यक्ष संतोष पावरी व उपाध्यक्ष सुधीर वासावे यांनी दिली.
मार्च अखेर पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. संस्थेची सभासद संख्या ४३३५, ९ कोटी ४ लाखांच्या ठेवी, ७ कोटी ४१ लाखांची कर्जे, गुंतवणूक २ कोटी ९० लाख, खेळते भांडवल ११ कोटी ७ लाखांचे आहे. स्वनिधी १ कोटी ४५ लाख, सीडी रेशो ६८.९६ टक्के, वसुली ९७.०७ टक्के, सोनेतारण कर्जवसुली १०० टक्के आहे. अध्यक्ष पावरी म्हणाले, सहकार क्षेत्रातील जुजबी माहिती असताना २० नोव्हेंबर २०१८ ला जिल्हास्तरावर खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था स्थापन झाली. सभासदांची विश्वासाहर्ता वाढवून ग्राहकांचा आर्थिक विकास साधत प्रगतीपथावर असणारी संस्था म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आली. पतसंस्थांना नव्याने सीआरएआर (भांडवलाचे मालमत्तेशी पर्याप्तता प्रमाण) ही नवी संकल्पना या वर्षीपासून लागू केली गेली. ९ टक्के सीआरएआर राखणे पतसंस्थांसाठी आवश्यक झाले. खारवी नागरी पतसंस्थेचा सीआरएआर हा १८.८० टक्के आहे. देणी भागवण्यासाठी संस्थेकडे पर्याप्त भांडवल क्षमता आहे. संस्था आर्थिकदृष्ट्या बलवान असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
सभासदांना आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस, क्यूआर कोड, एसएमएस बॅंकिंग या आधुनिक सुविधा दिल्या जातात. पतसंस्थेला दीपस्तंभ, बेस्ट महिला डायरेक्टर व बेस्ट महिला क्लार्क पुरस्कार मिळाले. संस्थेच्या अर्थचक्राला उत्तम सेवा देऊन गतिमान करणारे १३ जणांचे संचालक, मंडळ १३ जणांचे जिल्हा समन्वय समिती मंडळ व नवनियुक्त १ तज्ञ संचालक यांच्या सहकार्याची जोड संस्थेच्या आर्थिक उन्नतीकरीता प्राप्त झाली आहे, असे पावरी यांनी सांगितले.
अल्पावधीतच शाखा विस्तार होणार आहे. गतवर्षी शृंगारतळी व दाभोळ या शाखा सुरू झाल्या. दोन्ही शाखा घसघशीत नफ्यात आहेत. चालू आर्थिक वर्षात खंडाळा, पालशेत, पूर्णगड या तीन शाखा सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
सर्व ठेवीदार,कर्जदार,पिग्मीदार, सभासद,कर्मचारी अधिकारी, पिग्मी एजंट, वकील, ऑडिटर, सहकारी खात्याचे अधिकारी, हितचिंतक यांचा मोलाचा वाटा असून संस्था या सर्वांचा ऋणी आहे,यांबद्दल सर्वाना धन्यवाद देत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी व उपाध्यक्ष सुधीर वासावे यांनी यावेळी सांगितले.