(गुहागर)
रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, चिपळूण येथे रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृतीमंच, खेरशेत, (ता. चिपळूण) या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्यावतीने महाराष्ट्र शासनाच्या विधवा अनिष्ट प्रथा बंदच्या ठरावानुसार अंमलबजावणी करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायती, महिला बचत गट, महिला मंडळ, सामाजिक संस्था आणि जेष्ठ समाजसेवक यांना सन्मानित करण्याचा सोहळा, स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान – २०२३ संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने आणि राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सन २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने कृतिशील कार्यवाहीच्या माध्यमातून जनजागृतीपरत्वे गेली २८ वर्ष सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आरोग्य ,साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण व एड्स या क्षेत्रांत कार्यरत असलेली रत्नागिरी जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत,(ता.चिपळूण) या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्यावतीने ज्या ग्रामपंचायती मार्फत अनिष्ट विधवा प्रथा बंदच्या आदेशाची अंमलबजावणी करून विधवा महिलांच्या सन्माना करिता सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक उपक्रम राबविले आहेत. अशा ग्रामपंचायती समवेत विधवा महिलां बचत गटांना, महिला मंडळाना, सामाजिक संस्था आणि समाज सेवाकांना स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान २०२३ संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांनी जाहीर करून नामांकने मागितली होती.
त्यानुसार मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या संस्थेच्यावतीने समाजातील विधवा महिलांना विविध सामाजिक, धार्मिक,कौटुंबिक कार्यक्रमात मानसन्मान मिळावा. त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी किंवा प्रत्यक्ष कृतीतून नवा आदर्श निर्माण व्हावा या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीनी या अनिष्ट विधवा प्रथेला मूठ माती देऊन अशा महिलांचा सन्मान केला आहे किंवा विधवा महिलांकरिता सामाजिक कार्य करणाऱ्या पूर्णत: योगदान देणाऱ्या सामाजिक संस्था, महिला बचत गट ,महिला मंडळ, सामाजिक संस्था आणि ज्येष्ठ श्रेष्ठ समाज सेवकांना आधुनिक क्रांती पर्वातील स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान -२०२३ सन्मानार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर सोहळ्यात ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राम सभेत ठराव मंजूर करून विधवा अनिष्ट प्रथा, पुर्वापार चालत आलेल्या कालबाह्य रूढी-परंपरा, बालविवाह आणि अंधश्रद्धा यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी धाडसी निर्णय घेऊन त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी स्वतःच्या घरापासून म्हणजे काकांच्या निधनाच्या अंत्यसंस्कार सोपास्काराच्या वेळी काकीचे कोणतेही अलंकार न उतरवता ग्रामस्थांच्या सहकार्याने अंतविधी पार पाडला. तसेच विधवा महिलांना धार्मिक कार्यात हळदीकुंकू देऊन सन्मान करण्याची प्रथा चालू केली. अशा प्रकारे विधवांना समाजात मानसन्मान मिळवून देण्यासाठी आणि महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल सरपंच जनार्दन आंबेकर यांना स्त्री मुक्ती स्वातंत्र्याचा क्रांतीसुर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आयडाॅल आॅफ रत्नागिरी सन्मान २०२३ सन्मानार्थ पुरस्कार देऊन नामवंतांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. त्यांना स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
आपण केलेल्या कार्याची दखल घेऊन सन्मानित केल्याबद्दल मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृतीमंच, खेरशेत, ता. चिपळूण या संस्थेचे मुख्य प्रवर्तक श्री संजय शांताराम कदम आणि त्यांचे सर्व कुटूंबीय यांचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच सदरचा सन्मान मिळण्या मागे उमराठ खुर्द आंबेकरवाडी आणि उमराठ बुद्रुक या दोन्ही महसुली गावांतील ग्रामस्थांचा आणि उमराठ ग्रामपंचायतचे ग्राम सेवक सिद्धेश्वर लेंडवे भाऊ, कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम व डाटा आॅपरेटर शाईस दवंडे यांचे सक्रिय सहभाग व सहकार्याचे मोलाचे योगदान लाभल्यामुळे त्यांचे सुद्धा सरपंच जनार्दन आंबेकर यांनी धन्यवाद देऊन आभार मानले आहेत.