(खेड/ भरत निकम)
शहरातील नगर परिषद वसाहती जवळील साईमंदिर परिसरात गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या प्रथमेश नरेंद्र कानडे (३२, रा.कातळआळी, खेड) याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्याची १५ हजार रूपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या पथकाने ५ दिवसांपूर्वी रात्री गस्तीदरम्यान बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या प्रथमेश कानडे याच्याकडून १७ हजार ५१३ रूपये किंमतीचा गांजासह इतर साहित्य जप्त केले होते. ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही वेळेला चौकशीदरम्यान त्याला फिट आल्याने नोटीस बजावत पोलिसांनी उपचारासाठी सोडून दिले होते. ४ दिवसानंतर मंगळवारी, सकाळी १० वाजता त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. चव्हाण यांच्यासमोर हजर करण्यात आले.
आरोपीतर्फे ॲड. अश्विन भोसले व ॲड. सिद्धी खेडेकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत कानडे याची जामिनावर सुटका केली आहे.