(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दिवाळी आणि गणपतीत गरीबांना अवघ्या 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. त्यामुळे लाखो गोरगरीबांना ऐन सणासुदीत दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 5 हजार कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
गौरी गणपती आणि दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. त्यात प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल आदी साहित्य देण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा बॅगमध्ये प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल आदी गोष्टींचा समावेश या शिध्यामध्ये असणार आहे. सर्वसामान्यांचे सण हे आनंदात जावे यासाठी राज्य सरकारने मागील वर्षी आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सरकारने एका संस्थेला ५१३ कोटी रुपयांचा ठेका दिला होता.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
- राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवणार आहे. पाच हजार कोटीचा प्रस्ताव (आदिवासी विकास विभाग)
- गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा (अन्न व नागरी पुरवठा)
- आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा 500 रुपये मिळणार (कौशल्य विकास )
- मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी (महसूल विभाग)
- महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द (गृह विभाग )
- केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम, राज्याचा हिस्सा वाढला (महिला व बाल विकास)
- सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा 2023 चा अध्यादेश मागे (सहकार विभाग )
- दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन
(विधी व न्याय विभाग ) - मंडणगड येथे दिवाणी न्यायालय (विधी व न्याय विभाग)