(गुहागर)
तालुक्यातील पाचेरी आगर इथं गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं. गणेशमुर्ती असलेल्या वाहनाचे ब्रेक फेल होवून वाहन थेट मिरवणुकीत घुसल्यानं हा अपघात झाला. या अपघातात 17 वर्षाच्या मुलीसह एक प्रौढ व्यक्ती मृत्युमुखी पडला, तर 5 जण जखमी झाले आहेत.
जखमींपैकी दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तर तिघांना प्राथमिक उपचार करुन घरी पाठविण्यात आलं. या दुर्घटनेमुळे पाचेरी आगर गावावर शोककळा पसरली आहे.
अनंत चतुर्दशी असल्यानं गावागावात गणेश विसर्जनाचा सोहळा सायंकाळपासून सुरू झाला. गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर गावात विविध घरातील गणेश मुर्तींचे सामुहिक विसर्जन केले जाते. सायंकाळी 4 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणुक वाजतगाजत विसर्जन घाटाकडे जात होती. सायंकाळी 4.45 च्या दरम्यान मिरवणुकीत गणपती ठेवलेल्या एका टेम्पोचे ब्रेक फेल झाले आणि हा टेम्पो मिरवणुकीत नाचणाऱ्या गणेशभक्तांमध्ये घुसला.
या दुर्घटनेत कोमल भुवड (वय 17, रा. पाचेरीआगर) व दिपक भुवड (वय 48, रा. पाचेरीआगर) हे दोघे टेम्पोखाली चिरडून जागीच मृत्युमुखी पडले. अपघातात मृत्यू झालेले हे दोघेजण व जखमी झालेले गणेशभक्त हे सगळे पाचेरी आगर येथील भुवडवाडी येथे राहणारे आहेत. या गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. तर दिया रमेश भुवड (वय 16) व तेजल संदिप पाष्टे (वय 20), रिया रामचंद्र वेलोंडे (वय 12), स्नेहल संदिप पाष्टे (वय 23) आणि उषा गुणाजी पाष्टे (वय 56) जखमी झाले आहेत. सर्वांना आबलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आलं आहे.
या अपघाताचं वृत्त कळताच गुहागर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाठपोठ चिपळुण, गुहागरचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने देखील घटनास्थळी पोचले. आबलोली व पाचेरी आगर येथील घटनास्थळी पोलीसांकडून पुढील प्रक्रिया सुरु आहे.