(वैभव पवार / गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे नजीकच्या मालगुंड मध्ये गुरूवारी अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर दहा दिवसांच्या गणरायांना भावपुर्ण निरोप देण्यात आला. यावेळी गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मालगुंड येथील गायवाडी समुद्रकिनारी सर्व बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
मालगुंडमध्ये जोशीवाडी, नविंद्रवाडी तसेच बाजारपेठेतील दहा दिवसांच्या गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी काही गणपती विसर्जन मिरवणुका मालगुंड येथील गायवाडी समुद्रकिनारी तर दोन ते तीन मिरवणुका गणपतीपुळे येथील खाडीवर वाजतगाजत काढण्यात आल्या. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल पाटील, पोलीस नाईक जयेश किरण, होमगार्ड सुरज जाधव, संदेश धावडे, अनिकेत जाधव तसेच बंदोबस्तासाठी आलेल्या महिला पोलीस यांनी मोठी मेहनत घेतली.
गुरूवारी अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात सातारा, सांगली येथून विसर्जनासाठी दोन गणपती आले होते. हे गणपती गणपतीपुळे समुद्रामध्ये विसर्जनासाठी आणण्यात आले होते. परंतु गणपतीपुळे समुद्राला भरती असल्याने गणपतीपुळे खाडीवर विसर्जन करावे, अशी सूचना गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी केली. त्यानंतर दोन्हीही गणपती गणपतीपुळे खाडीवर विसर्जन करण्यात आले.