(गणपतीपुळे/ वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील पर्यटन विकास आराखड्यातील विकासकामांपैकी स्वागत कमानीचे काम गेल्या तीन- चार वर्षांपूर्वी करण्यात आले होते. या कामाची संपूर्ण कार्यवाही रत्नागिरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आल्यानंतर आता याच स्वागत कमानीचे बांधकाम ठेकेदाराकडून पाडण्यात आले आहे. सा. बा. विभागाकडून गणपतीपुळे येथील आपटातिठा मार्गावर असलेल्या पूर्वीच्या स्वागत कमानीच्या ठिकाणी नव्याने कमानीचे काम करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे नवीन काम हाती घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पहिल्यांदा केलेल्या कामाचा लाखो रुपयांचा खर्च वाया घालविल्याची चर्चा गणपतीपुळे परिसरात सुरू आहे.
यापूर्वी येथील स्वागत कमानीचे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नेमण्यात आलेल्या ठेकेदाराकडून कमानीची लांबी व रुंदी अतिशय ओबडधोबड पद्धतीने करण्यात आली होती. त्यामुळे याच ठिकाणी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचा करनाका असल्याने येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाल्याचे चित्र वारंवार दिसून येत होते. गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी या कमानीचे बांधकाम झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तज्ञ इंजीनियरकडून कमानीच्या कामाचे मुल्यांकन केल्यानंतर त्याचा दर्जा नेमका कशाप्रकारे असायला हवा होता याचे भान संबंधित इंजिनिअर, ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना असायला हवे होते. स्वागत कमानीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आणि ओबडधोबड पद्धतीने करण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अखेर याच कामाची दखल घेऊन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या कमानीचे काम नव्याने करण्याच्या सूचना दिल्याचे बोलले जात आहे. तसेच नुकत्याच झालेल्या पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गणपतीपुळे येथील दौऱ्यातील जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या सूचनेनुसार गणपतीपुळे येथील स्वागत कमानीचे बांधकाम गेल्या चार- पाच दिवसांपूर्वी पाडण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता नव्याने स्वागत कमानी करण्याचा घाट घातला जात असून पहिल्यांदा केलेल्या कामाचा लाखो खर्च वाया घालवून पर्यटन विकास आराखड्यातील कामे नेमकी कशा प्रकारे केली जातात किंवा यापुढे कशा पध्दतीने उर्वरित कामे होणार आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.